ते तेजोमय संगीत, आगमनाचे संगीत -- ऐडाचे "दी एलीफंट मार्च" -- मी माझ्या अंत्यसंस्कारासाठी निवडले आहे -- (हशा) आणि तुम्ही पाहतच आहात का ते. ते विजयाचे गाणे आहे. त्यावेळी मला काहीच कळणार नाही -- पण शक्य झाल्यास -- मला मी जगू शकलो यातच आणि या दैदिप्यमान ग्रहावर जगू शकलो यात आणि माझे इथले अस्तित्व संपण्यापूर्वी मुळात इथे मी कसा आलो हे कळण्याची संधी मिळाली यातच एक मोठी कामगिरी केली असे वाटेल.
माझा वेगळासा इंग्रजी हेल तुम्हाला कळतोय का? इतरांप्रमाणेच, मी कालच्या प्राण्यांविषयीच्या सत्राने मुग्ध झालो होतो. रॉबर्ट फूल आणि फ्रांस लँटींग आणि इतरांनी -- दाखवलेल्या गोष्टींच्या सौंदर्यामुळे. कर्कश्यपणा जाणवला तेव्हाच जेव्हा जेफरी कॅझनबर्ग जंगली घोड्यांबद्दल म्हणाले, "देवाने पृथ्वीवर जन्मास घातलेले सर्वात रुबाबदार प्राणी." आता नक्कीच, आपल्याला माहित आहे त्यांना त्या अर्थाने म्हणायचे नव्हते, पण या देशात या क्षणी, तुम्ही जेवढी काळजी घ्याल तेवढी कमी आहे. (हशा)
मी जीवशास्त्रज्ञ आहे, आणि आमच्या विषयाचे मुख्य प्रमेय : रचनेचा सिद्धांत, डार्विनचा नैसर्गिक निवडीतून होणार्या उत्क्रांतीचा सिद्धांत. व्यावसायिक वर्तुळांत सर्वत्र तो नक्कीच स्विकारला जातो. आणी अमेरीकेबाहेरील अव्यावसायिक वर्तुळांत बहुदा दुर्लक्षित आहे, पण अमेरीकेतील अव्यावसायिक वर्तुळांत हा सिद्धांत एवढी शत्रुत्वाची भावना निर्माण करतो आहे -- (हशा) -- की अमेरीकेतील जीवशास्त्रज्ञ युद्धाच्या स्थितीत आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी एकानंतर एका राज्यातील न्यायालयात सुरू होत असलेल्या खटल्यांमुळे हे युद्ध सध्या इतके चिंताजनक आहे की मला याबद्दल काही बोलावेसे वाटले.
जर तुम्हाला डार्विनिच्या सिद्धांताबद्दल माझे मत जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते तुम्हाला माझी पुस्तके पाहावी लागतील, जी बाहेरील दुकानात मिळणार नाहीत. (हशा) समकालीन खटले निर्मितीवादाच्या एका नवीनच आवृत्तीशी संबंधित आहेत जिचे नाव आहे इंटेलिजंट डिझाईन(ID) (बुद्धिमान निर्मात्याने केलेली संरचना), फसू नका कारण यामध्ये काहीच नवीन नाही आहे. कारण हे फक्त निर्मितीवादाचे दुसरे नाव आहे -- नवीन बारसे केल्यानंतरचे (रि'ख्रिश्चन्ड') -- मी तो शब्द मुद्दामच वापरतो आहे -- (हशा) राजकीय चाल म्हणून.
या बुद्धिमान संरचनावादी म्हणवल्या जाणाऱ्यांचे मुद्दे तेच जुने आहेत जे वारंवार खोडून टाकण्यात आले आहेत, डार्विनपासून ते आजपर्यंत. विज्ञानाच्या बाजूने लढाई लढणारी उत्क्रांतीवाद्यांची एक परिणामकारक फळी आहे, आणि माझ्याकडून त्यांच्यासाठी मला जमेल ते मी करत असतो, पण जेव्हा आम्ही असे सांगण्याची हिंमत दाखवतो की आम्ही उत्क्रांतीवादी आहोत आणि निरीश्वरवादीही आहोत तेव्हा ते या लोकांना आवडत नाही. त्यांना वाटते की आम्ही खाजवून खरूज काढतोय, आणि तुम्हाला कळेलच का ते. निर्मितीवादी लोक कोणत्याही सुसंगत वैज्ञानिक मुद्द्यांच्या अभावी निरीश्वरवाद्यांच्या विरोधातील सर्वप्रसृत भावना भडकवून या वादात वापरतात. मुलांना जीवशास्त्राच्या वर्गात उत्क्रांतीवाद शिकवा आणि ती मादकद्रव्यांच्या आहारी जातील, चोऱ्या करतील आणि वासनेच्या आहारी जातील. (हशा)
खरेतर, शिकलेले अध्यात्मवादी, अगदी पोपपासून सगळे, उत्क्रांतीवादामागे निश्चितच ठामपणे उभे आहेत. केनेथ मिलरचे पुस्तक "डार्विनच्या देवाच्या शोधात", बुद्धिमान संरचना सिद्धांतावरील मला माहिती असलेल्या सर्वात परिणामकारक हल्ल्यांपैकी एक आहे आणि एका धर्मनिष्ठ ख्रिश्चनाने लिहिल्याने आणखीच परिणामकारक आहे. केनेथ मिलरसारखे लोक उत्क्रांतीवादी लोकांसाठी देवदूतासारखे आहेत -- (हशा) -- कारण ते उत्क्रांतीवाद म्हणजेच निरीश्वरवाद यातील असत्यता लोकांसमोर आणतात. पण माझ्यासारखे लोक त्यांच्यासाठी त्रासदायक भूमिका घेतात.
पण इथे मला निर्मितीवाद्यांबद्दल काही चांगले बोलायचे आहे. मी सहसा असे करत नाही त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. (हशा) मला वाटते ते एका गोष्टीबाबत बरोबर आहेत. मला वाटते की उत्क्रांतीवाद हा मूलतः धर्माच्या विरोधात आहे हा त्यांचा समज बरोबर आहे.
मी आधीच म्हणालो की काही उत्क्रांतीवादी लोक, पोपसारखे, धार्मिक आहेत, पण ते स्वतःलाच संभ्रमात ठेवतायत. मी असे मानतो की डार्विनच्या सिद्धांताचा खरा अर्थबोध धार्मिक श्रद्धांना सुरूंग लावणारा आहे. आता, तुम्हाला वाटेल की मी निरीश्वरवादाचे प्रवचन देतोय, आणि मी तुम्हाला भरवसा देतो की मी तसे करणार नाही आहे, अशा शिकलेल्या तुमच्यासारख्या प्रेक्षकांसमोर तसे करणे म्हणजे पुजार्यासमोर प्रवचन देण्यासारखे होईल.
नाही, त्याऐवजी मला तुम्हाला प्रवृत्त करायचे आहे -- (हशा) मला तुम्हाला प्रवृत्त करायचे आहे आक्रमक निरीश्वरवादाकडे. (हशा) (टाळ्या) पण तसे म्हणणे जरा जास्तच नकारार्थी होईल. मला हवे असते तर -- जर मी असा मनुष्य असतो ज्याला धार्मिक श्रद्धा जपण्याची इच्छा आहे, तर मला उत्क्रांतीवादी विज्ञानाच्या किंवा कोणत्याही विज्ञानाच्या, पण विशेष करून, उत्क्रांतीच्या प्रेरणादायक आणि मंत्रमुग्ध करू शकणाऱ्या सकारात्मक शक्तीची प्रचंड भिती वाटली असती -- एकाच कारणाठी, ते निरीश्वरवादी आहे म्हणून.
आता, कोणत्याही जीवशास्त्रीय सिद्धांतासाठी सजीव वस्तूंच्या प्रचंड सांख्यिकीय अशक्यतेबद्दल समजावून सांगणे हा सर्वात मोठा अडथळा आहे. चांगल्या संरचना घडण्याच्या बाबतीत असणारी सांख्यिकीय अशक्यता -- यासाठी क्लिष्टता असाही शब्द आहे. निर्मितीवाद्यांचा प्रमाण मुद्दा -- एकच आहे, सर्व मुद्दे या एकाच ठिकाणी येतात -- सांख्यिकिय अशक्यतेच्या आधारावर बांधला जातो. सजीव प्राणी इतके क्लिष्ट आहेत की ते फक्त योगायोगाने बनणे अशक्य आहेत; म्हणूनच त्यांचा कोणी कर्ता-करविता असला पाहिजे. हा मुद्दा नक्कीच स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारणारा आहे. कोणताही कर्ता जो खरोखर क्लिष्ट रचना करू शकतो तो स्वतः त्याहीपेक्षा जास्त क्लिष्ट असला पाहिजे आणि ही क्लिष्टता आहे त्याने करायच्या इतर कामांपूर्वीची जसे पापे माफ करणे, लग्नांत आशीर्वाद देणे, प्रार्थना ऐकणे -- -- युद्धात आपल्या बाजूला मदत करणे -- (हशा) -- आपले लैंगिक जीवन वाईट ठरवणे आणि इतर. (हशा)
कोणत्याही जीवशास्त्रीय सिद्धांताला क्लिष्टतेचा प्रश्न सोडवायला लागतो, आणि तो तुम्हाला त्याहीपेक्षा जास्त क्लिष्ट कर्ता कल्पून आणि त्यातून प्रश्न अधिकच जटिल करून सोडवता येत नाही. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा थक्क करण्यासारखा मोहक आहे कारण तो अगदी सोप्या पद्धतीने क्लिष्टतेचे स्पष्टीकरण समजावून सांगतो. तो तसे करतो हळूहळू पायरी-पायरीने होत जाणाऱ्या बदलांची एक सपाट उतरंड देऊन. पण इथे, मला फक्त एवढाच मुद्दा सांगायचा आहे की डार्विनचा सिद्धांत हा धर्माला गंज चढवणारा आहे कारण तो आहे सुंदर, किती मितव्ययी, किती ताकदवान, आर्थिकदृष्ट्या ताकदवान. त्यात एका सुंदर झुलत्या पुलासारखी पुष्ट काटकसर आहे.
देवाचा सिद्धांत फक्त एक वाईट सिद्धांतच नाही तर असे दिसून येते की, तात्त्विकदृष्ट्या त्याला करायचे कामही न करू शकणारा आहे.
तर परतूया राजकीय चाली आणि उत्क्रांतीवादी फळीकडे, मला असे म्हणायचे आहे की त्रासदायक भूमिका घेणे हीच चांगली गोष्ट करणे आहे. निर्मितीवादावर हल्ला चढवण्याची माझी पद्धत उत्क्रांतीवाद्यांसारखी नाही. निर्मितीवादावर हल्ला करण्याच्या माझ्या पद्धतीत संपूर्ण धर्मावर हल्ला केलेला असतो, आणि या ठिकाणी मला धर्माविरुद्ध वाईट बोलण्यावरच्या विलक्षण निषिद्धतेवर बोलायचे आहे, आणि मी तसे करणार आहे डग्लस ऍडम्सच्या शब्दात, माझा प्रिय मित्र, तो जर TED ला कधी आला नसला तर त्याला निश्चितच आमंत्रित करायला हवे होते.
(रिचर्ड सॉल वर्मन: ते आले होते.)
रिचर्ड डॉकिन्स: आला होता. चांगले आहे. मला वाटलेच होते तो आला असेल असे.
त्याच्या मृत्यूच्या काही काळ आधी त्याने केंब्रीजमध्ये ध्वनीमुद्रित केलेले हे भाषण तो असे सुरू करतो. तो सुरूवातीला समजावून सांगतो की विज्ञान कसे खंडन करण्यासारख्या गृहितांच्या चाचण्या घेऊन आणि तशा गृहितांना फेकून देऊन) त्यातून पुढे जाते आणि मग पुढे म्हणतो. मी त्याचे अवतरण वाचतोय, "धर्म तसे काम करतो असे वाटत नाही, त्याच्या मुळाशी काही कल्पना आहेत, ज्यांना आपण पवित्र म्हणतो, त्याचा अर्थ असा असतो की ही अशी एक कल्पना आहे जिच्याविषयी तुम्हाला काहीही वाईट बोलण्याची परवानगी नाही. तुम्ही बोलायचे नाही, का नाही? कारण तुम्ही बोलायचे नाही. (हशा) असे का असावे की तुमचे रिपब्लिकन वा डेमोक्रॅट लोकांविषयी किंवा या वा त्या अर्थव्यवस्थेविषयी किंवा मॅकिंतोश किंवा विंडोजविषयी मत असणे एकदम न्याय्य आहे, पण विश्व कसे सुरू झाले, कोणी तयार केले याबद्दल तुमचे काही मत असेल तर, नाही, ते पवित्र आहे. तर, आपल्याला धार्मिक कल्पनांबद्दल प्रश्नचिन्ह न उभे करण्याची सवय झाली आहे आणि जेव्हा रिचर्ड तसे करतो त्यावेळी किती गदारोळ उडतो हे पाहणे मजेशीर आहे." त्याला माझ्याविषयी म्हणायचे होते, त्या रिचर्डविषयी नाही.
"सगळेजण याबाबत एकदम आक्रमक होतात, कारण या गोष्टी बोलण्याची तुम्हाला परवानगी नाही, पण जर तुम्ही याकडे तर्कयुक्त पद्धतीने पाहिले तर चर्चा करण्यासाठी या गोष्टी का इतरांसारख्याच खुल्या असू नयेत यासाठी फक्त, आपण याबाबत चर्चा करायची नाही असा आपल्यातच केलेला ठराव, याव्यतिरिक्त वेगळे कोणतेच कारण मिळणार नाही" आणि ते होते डग्लसचे बोल.
माझ्या मते, फक्त विज्ञान धर्माला गंज चढवणारेच आहे असे नाही धर्मही विज्ञानाला गंज चढवणारा आहे. तो क्षुल्लकशा, अदभूत अ-स्पष्टीकरणांनी लोकांना समाधानी होण्यास शिकवतो आणि त्यांना आपल्या कवेत असणाऱ्या आश्चर्यकारक अशा खऱ्या स्पष्टीकरणांबाबत आंधळे बनवतो. तो त्यांना नेहमी पुराव्यांबाबत आग्रही राहण्याऐवजी हुकूमत, साक्षात्कार आणि श्रद्धा यांना स्वीकारण्यास सांगतो.
तो आहे डग्लस ऍडम्स, त्याच्या "पाहण्याची शेवटची संधी" पुस्तकातील एक दैदीप्यमान चित्रात. आता क्वार्टरली रिविव ऑफ बायोलॉजी ही एक नमुनेदार वैज्ञानिक पत्रिका आहे. आणि मी पाहुणा संपादक म्हणून एक तिचा विशेष अंक घडवून आणणार आहे, "अशनींमुळे डायनासोरांचा नाश झाला का?" या प्रश्नासंबंधी. आणि त्यातील पहिला निबंध आहे पुरावा सादर करणारा एक प्रमाण वैज्ञानिक शोधनिबंध. "युकाटान येथील के-टी सीमेवरील पोटॅशियम-आरगॉन पद्धतीने कालमापन केलेल्या ईरिडियमच्या थरामुळे अशनीच डायनासोरांच्या नाशाचे कारण होते असा संकेत मिळतो." अगदी साधारण वैज्ञानिक शोधनिबंध. आता पुढचा, "दी रॉयल सोसायटीच्या अध्यक्षांना एक अंतस्थ पक्की खात्री प्रदान करण्यात आली आहे की " -- (हशा) -- एका अशनीमुळेच डायनासोर मृत्यूमुखी पडले" (हशा) "प्राध्यापक हक्स्टेन यांना गुप्तपणे साक्षात्कार झाला आहे की" एका अशनीमुळेच डायनासोर मृत्यूमुखी पडले" (हशा) "प्राध्यापक होर्डली यांना लहानपणापासून असे वाढवण्यात आले आहे की त्यांची निर्विवाद आणि संपूर्ण श्रद्धा आहे." (हशा) "... एका अशनीमुळेच डायनासोर मृत्यूमुखी पडले यावर" प्राध्यापक हॉकिन्स यांनी सर्व हॉकिन्सवाद्यांना लागू अशा या तत्त्वाची घोषणा केली आहे की एका अशनीमुळेच डायनासोर मृत्यूमुखी पडले." (हशा) नक्कीच हे अकल्पनीय आहे.
पण समजा -- (टाळ्या) -- १९८७ मध्ये, एका पत्रकाराने जॉर्ज बुश थोरले यांना विचारले की ते निरीश्वरवादी अमेरीकन लोकांचे देशप्रेम आणि नागरिकत्व मान्य करतात का. श्री बुश यांचे उत्तर कुप्रसिद्ध बनले आहे. "नाही. मला वाटत नाही की निरीश्वरवादी लोकांना नागरिक मानले पाहिजे, किंवा त्यांना देशभक्त मानले पाहिजे. हा संपूर्ण देश देवाच्या अधिपत्याखाली आहे."
बुश यांची धर्मांधता एका क्षणाला डोके फिरून झालेली आणि नंतर मागे घेतलेली एकाकी चूक नव्हती. परत परत स्पष्टीकरण किंवा उत्तर मागे घेण्यासाठी विचारल्यावरसुद्धा ते त्या भुमिकेशी ठाम होते. त्यांना खरोखर तसेच म्हणायचे होते. खरा मुद्दा हा होता की त्यामुळे त्यांच्या निवडणुकीवर काहीच बाधा होणार नव्हती, उलट फायदाच झाला असता. निवडून येण्यासाठी डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स त्यांच्या धार्मिकतेचे खुले प्रदर्शन करतात. दोन्ही पक्ष हा देश देवाच्या अधिपत्याखाली असल्याच्या घोषणा करतात. थॉमस जेफरसन काय म्हणले असते? ब्रिटीश असण्याचा मला सहसा जास्त अभिमान नाही आहे, पण या अनुषंगाने एक तुलना केल्याशिवाय राहवले नाही. (टाळ्या)
व्यवहारात एक निरीश्वरवादी म्हणजे काय? निरीश्वरवादी म्हणजे असा कोणीतरी ज्याला येशुबद्दल अगदी तसेच वाटते जसे एका सुसंस्कृत ख्रिश्चनाला थोर किंवा बाल किंवा सोनेरी पाडसाबद्दल वाटते. पूर्वी म्हणल्या प्रमाणे, सर्व मानववंशाने विश्वास ठेवलेल्या सगळ्या देवांपैकी जवळजवळ सर्वच देवांच्या बाबतीत आपण सगळे निरीश्वरवादीच आहोत. आपल्यातील काही फक्त आणखी एका देवावर विश्वास ठेवणे सोडून देतात. (हशा) (टाळ्या)
आपण निरीश्वरवादाची व्याख्या कशीही केली तरी, ती अशी एक अभ्यासाची विचारपद्धती आहे जी कोणीही माणूस धरू शकतो, त्यासाठी त्याला देशद्रोही, निवडणूकीला अपात्र किंवा अ-नागरीक अशी नावे ठेवण्याची गरज नाही आहे. काहीही झाले तरी, याघडीला हे अखंडनीय तथ्य आहे की तुम्ही स्वतःला निरीश्वरवादी म्हणवताय म्हणजेच तुम्ही स्वतःची ओळख श्री. हिटलर किंवा कु. बीलझेबब म्हणून करून दिल्यासारखी आहे. आणि या सगळ्याची सुरुवात होते निरीश्वरवादी म्हणजे कोणत्यातरी प्रकारचे विचित्र असामान्य अल्पसंख्य लोक या समजातून.
नताली अँजीयर यांनी न्यु यॉर्कर मध्ये एक दुःखद लेख लिहीला आहे, निरीश्वरवादी म्हणून त्यांना कसे एकाकी वाटले याबद्दल. त्यांना स्वच्छपणे त्रासात असणाऱ्या अल्पसंख्यकांसारखे वाटते, पण खरे तर अमेरिकेतील निरीश्वरवाद्यांची लोकसंख्या किती आहे? सर्वात नवे सर्वेक्षण वाचणे आश्चर्यकारकपणे उत्साहवर्धक आहे. ख्रिस्ती धर्म, नक्कीच लोकसंख्येतील सिंहाचा वाटा उचलतो, जवळजवळ १६ कोटी. पण तुम्हाला काय वाटते दुसऱ्या क्रमांकाला कोण असेल, २८ लाख ज्यु लोकांच्या पेक्षा जास्त, ११ लाख मुस्लिम, हिंदू , बोद्ध आणि इतर धर्माच्या लोकांपेक्षा जास्त? दुसऱ्या क्रमांकाचा मोठा गट ३ कोटी लोकांचा निधर्मवादी किंवा धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणाऱ्यांचा.
मत मागणारे राजकारणी ज्यू लोकांच्या आघाडीच्या ताकदीला एवढे का घाबरतात याबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. इस्रायल देश अमेरिकन ज्यू लोकांच्या मतातून अस्तित्त्वात आला आहे, आणि त्याच वेळी निधर्मवाद्यांना राजकीय विस्मृतीत ढकलले जाते. ही धर्मनिरपेक्ष निधर्मवादी मते, जर एकत्रित केली, तर ज्यू लोकांच्या मतांपेक्षा नऊपट आहेत. वाटते त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असलेले हे अल्पसंख्यक आपल्या राजकीय ताकदीचा का वापर करत नाहीत?
बर, हे झाले संख्येबद्दल. दर्जाबद्दल काय? बुद्धिमत्ता आणि धार्मिक असणे यात काही सकारात्मक किंवा नकारात्मक परस्परसंबंध आहे का? (हशा)
वरचे सर्वेक्षण, जे ARIS सर्वेक्षण आहे, त्यात सामाजिक-आर्थिक वर्गांनुसार किंवा शिक्षण, बुद्ध्यांक किंवा इतर कोणत्याही प्रकारे माहिती विभागलेली नव्हती. पण पॉल जी बेल यांनी मेन्सा पत्रिकेत लिहिलेल्या एका नवीन लेखात काही संकेत मिळतात. मेन्सा तुम्हाला माहितीच आहे, सर्वोच्च बुद्ध्यांक असणाऱ्या लोकांसाठीची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आणि साहित्याच्या विश्लेषणांचा अभ्यास करून, बेल यांनी असा निष्कर्ष काढला की, हे त्यांचे बोल, "१९२७ पासून बुद्धिमत्ता आणि धार्मिकता यांच्याबाबत केलेल्या ४३ निरीक्षणांतील ४ सोडून बाकी इतर निरीक्षणात उलटा संबंध सापडला, म्हणजेच ज्यांची बुद्धिमत्ता किंवा शैक्षणिक पातळी जास्त असते, त्यांची धार्मिक असण्याची शक्यता कमी असते." माझ्याकडे मुळच्या ४२ निरीक्षणांचे संदर्भ नाहीत आणि मी या निरीक्षणांच्या विश्लेषणावर काही बोलू शकत नाही पण मला अजून याच पद्धतीची निरीक्षणे पाहणे आवडेल. आणि मी थोडीशी वशिलेबाजी करू शकलो तर, येथील श्रोत्यांमधील असे बरेच लोक आहेत जे अशा विशाल सर्वेक्षणांसाठी पैसे देऊन हा प्रश्न कायमचा संपवतील, आणि हे करून जो काही फायदा होईल त्यासाठी मी हा प्रस्ताव मांडतो.
पण मला दाखवू द्या एका विशिष्ट गटाबद्दलची प्रकाशित झालेली आणि विश्लेषण केली गेलेली माहिती, १९९८ मधील वरिष्ठ शास्त्रज्ञांबद्दलची, लार्सन आणि विथम यांनी नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायंसेसवर निवडून देऊन सन्मानित केल्या गेलेल्या अमेरिकन वैज्ञानिकांची मते विचारली. आणि या विशेष गटातील, वैयक्तिक देवावरील विश्वासाची टक्केवारी अगदी सातपर्यंत खाली आली. २० टक्के लोक अज्ञेय आणि राहिलेले सर्व निरीश्वरवादी म्हणता येतील. वैयक्तिक अमरत्वावरील विश्वासाबद्दलची अशीच आकडेवारी मिळाली. जीवशास्त्रज्ञांच्यात तर यापेक्षाही कमी टक्केवारी होती, फक्त ५.५ टक्के देवावर विश्वास ठेवतात. भौतिकशास्त्रज्ञांच्यात ती ७.५ टक्के एवढी होती. मी इतर, इतिहास किंवा तत्त्वज्ञानासारख्या, क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची अशी टक्केवारी पाहिली नाही आहे पण ती यापेक्षा वेगळी असली तरच मला आश्चर्य वाटेल.
तर, आपण पोचलो आहोत एका खरोखर नोंद घेण्याजोग्या परिस्थितीकडे, अमेरीकन बुद्धीवादी आणि अमेरीकन मतदार यांच्यातील घाणेरड्या असमानतेच्या. बऱ्याचश्या अमेरीकन शास्त्रज्ञांचे किंवा एकंदरच बहुतेक बुद्धिवाद्यांचे विश्वाच्या रचनेविषयीच्या तत्त्वज्ञानाबद्दलचे मत अमेरिकतील मतदारांना इतके भयानक वाटते की साधारण निवडणूकीत कोणीही उमेदवार त्याला दुजोरा देणार नाही. साधारण निवडणूकीत कोणीही उमेदवार त्याला दुजोरा देणार नाही. जर मी बरोबर असेन तर, याचा अर्थ हा आहे की या पृथ्वीवरील सर्वात महान देशातील राजकीय गादी, त्यावर बसण्यास सर्वात जास्त योग्य अशा लोकांना मिळू शकत नाही, जर ते त्यांच्या विश्वासाविषयी खोटे बोलण्यास तयार नसतील तर. स्पष्टपणेच बोलायचे असेल तर, अमेरीकेतील राजकीय संधी हुशार आणि त्याबरोबरच प्रामाणिक असलेल्या लोकांसाठी खुल्या नाहीत. (टाळ्या)
मी या देशाचा नागरिक नाही, म्हणून असे वाटते की याविषयी काही करायला हवे अशी सुचना केल्यास ते अयोग्य मानले जाणार नाही. (हशा) आणि मी आधीच थोडीशी कल्पना दिली आहे ते काय करावे लागेल त्याबद्दल. मी TED मध्ये जे काही पाहिले आहे त्यावरून ते सुरू करण्यासाठी हीच आदर्श जागा आहे असे मला वाटते. परत त्यासाठी पैशाची गरज आहे. आपल्याला गरज आहे अशा मोहीमेची ज्यात अमेरिकन निरीश्वरवादी खुलेपणाने स्वतः निरीश्वरवादी असल्याची घोषणा करतील. (हशा) ही मोहीम काही वर्षापूर्वी समलैंगिक लोकांनी केलेल्या मोहीमेसारखीच असू शकेल, पण आपल्याला लोकांच्या इच्छेविरूद्ध त्यांना निरीश्वरवादी जाहीर करावे लागण्यासारख्या थराला जावे लागू नये अशी आशा आहे. जे जे लोक निरीश्वरवादी म्हणून बाहेर येतील ते निरीश्वरवादी लोकांच्यात काहीतरी चुकीचे आहे ही दंतकथा खोडून काढण्यास मदत करतील.
उलट ते हे दाखवून देतील की निरीश्वरवादी लोक सहसा या पद्धतीचे लोक आहेत जे तुमच्या मुलांसाठी आदर्श म्हणून चांगले आहेत. असे लोक जे जाहिरातदार विविध वस्तूंच्या शिफारशीसाठी वापरू शकतील. या खोलीत बसले आहेत तसे लोक. आणि यातून एक स्फोटक परिणाम झाला पाहिजे, सकारात्मक प्रतिक्रियांचा, ज्यामुळे जेवढी जास्त नावे आपल्याकडे असतील तेवढी जास्त नवीन नावे आपल्याला मिळतील. यात एकदम अरेखिय प्रमाणात वाढ होईल, एक विशिष्ट पातळी गाठली की, सदस्यत्व घेण्यात अकस्मात वेग येईल. पण यासाठी लागेल भरपूर पैसा.
माझी अशी शंका आहे की निरीश्वरवादी या शब्दातच प्रमाणापेक्षा अतीजास्त अडथळा आहे ज्यामुळे त्याचा खरा अर्थ लोकांना समजायला आणि जे लोक इतर वेळेला स्वतःला निरीश्वरवादी जाहीर करू शकले असते त्यांना थोडी भीती वाटते. रस्ता सपाट करण्यासाठी, चाकात तेल घालण्यासाठी आणि कडू गोळी गोड करण्यासाठी कोणते दुसरे शब्द वापरता येतील? डार्विनला अज्ञेय हा शब्द आवडला -- फक्त त्याचा मित्र हक्सलीच्या निष्ठेखातरच नव्हे, ज्याने हा शब्द काढला.
डार्विन म्हणाला, "मी देवाचे अस्तित्व नाकारायच्या अर्थाने निरीश्वरवादी कधीच नव्हतो. साधारणपणे माझ्या मानसिक स्थितीचे अज्ञेय या शब्दाने सर्वात जास्त योग्य वर्णन करता येईल."
डार्विन एडवर्ड एवलिंगबरोबर प्रमाणापेक्षा जास्त चिडून वागला. एवलिंग एक अतिरेकी निरीश्वरवादी होता ज्याने आपल्या निरीश्वरवादाबद्दलच्या पुस्तकाचे समर्पण डार्विनला स्विकारायला लावण्याचा अपयशी प्रयत्न केला -- यातूनच असा मजेशीर चुकीचा समज झाला की कार्ल मार्क्सने आपले 'दास कापिटाल' डार्विनला समर्पित केले, जे त्याने केले नव्हते. तो एडवर्ड एवलिंग होता. झाले असे की एवलिंगची प्रेमिका मार्क्सची मुलगी होती आणि जेव्हा डार्विन आणि मार्क्स दोघेही वारले, मार्क्सचे कागद आणि एवलिंगचे कागद एकत्र मिसळले आणि "महोदय, अनेक धन्यवाद पण कृपया तुमचे पुस्तक मला समर्पित करू नका" असे डार्विनचे पत्र मार्क्ससाठी लिहीले गेले असा समज झाला, त्यातूनच या गोष्टीचा उदय झाला, जी तुम्ही ऐकली असेल. मार्क्सने त्याचे कापिटाल डार्विनला समर्पित करायचा प्रयत्न केला ही एक नागरी दंतकथा आहे.
काहीही असो, तो एवलिंग होता आणि जेव्हा ते भेटले, तेव्हा डार्विनने त्याला हटकले, "तुम्ही लोक स्वतःला निरीश्वरवादी का म्हणता?" एवलिंगने टोमणा मारला की, "अज्ञेय शब्द म्हणजे सन्माननिय पद्धतीने लिहिलेला निरीश्वरवादी शब्दच आहे, आणि निरीश्वरवादी हा शब्द म्हणजे आक्रमक पद्धतीने लिहिलेला अज्ञेय शब्दच आहे." डार्विनने तक्रार केली की, "पण तुम्हाला एवढे आक्रमक होण्याची काय गरज आहे?" डार्विनला वाटत होते की बुद्धीवाद्यांसाठी निरीश्वरवाद चांगला आहे पण जनसामान्य त्यासाठी अजुनी, उद्धरित करतोय, "परिपक्व नाहीत". हा म्हणजे तोच मुद्दा आहे, आपल्या ओळखीचा, त्रासदायक भुमिका न घेण्याबाबतचा. एवलिंगने डार्विनला त्याच्या (बुद्धीवादी असल्याबद्दलच्या) गर्वाचे घर खाली करायला सांगितले का याबाबत कोठेही नोंद नाही. (हशा)
पण काही झालेतरी ते होते १०० वर्षांपूर्वीचे. तेव्हापासून आपण थोडे सुधारलो आहोत असे आपल्याला वाटते. आता एक मित्र, एक बुद्धिमान माजी-ज्यू, जो आपल्या संस्कृतीशी एकजूट दाखवण्यासाठी सबाथ पाळतो, स्वतःला दंतपरी अज्ञेय समजतो, तो स्वतःला निरीश्वरवादी म्हणत नाही कारण, तात्त्विकदृष्ट्या, एखादी गोष्ट अस्तित्वात नाही हे सिद्ध करणे अशक्य आहे, पण अज्ञेयवादातून असा समज पसरतो की देवाचे अस्तित्व असण्याची शक्यता त्याच्या अस्तित्वात नसण्याच्या शक्यतेएवढीच आहे.
म्हणून माझा मित्र दंतपरीच्या बाबतीत अगदी अज्ञेयवादी आहे, पण दंतपरीचे अस्तित्व जवळ जवळ अशक्य आहे, नाही का? देवासारखेच. म्हणून वाक्प्रचार, "दंतपरी अज्ञेय" पण बर्ट्रांड रसेल यानी मंगळाभोवती फिरणाऱ्या एका काल्पनिक चहाच्या किटलीबद्दल असाच मुद्दा मांडला. खरेतर तुम्हाला मंगळाभोवती फिरणार्या या चहाच्या किटलीबद्दल अज्ञेयवादीच असले पाहिजे, पण त्याचा अर्थ असा नाही की तिच्या अस्तित्वाची शक्यता तिच्या नसण्याच्या शक्यतेएवढीच आहे.
ज्या गोष्टींबद्दल अज्ञेयवादी असावे त्यांची यादी फक्त दंतपरी किंवा चहाची किटली यांतच संपत नाही. ती अगणित आहे, जर तुम्हाला त्यातील एकावरही विश्वास ठेवायचा असेल, बायबलमधील एकशिंगवाल्या प्राण्यावर, दंतपर्यांवर, चहाच्या किटलीवर किंवा येशुवर, तर त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. का नाही हे सांगण्याची जबाबदारी आमच्यावर नाही. आम्ही जे निरीश्वरवादी आहोत ते निष्परीवादी आणि निष्किटलीवादीही आहोत. (हशा)
पण आम्ही तसे म्हणण्याचे कष्ट घेत नाही, आणि म्हणूनच बाकीचे लोक ज्यांना निरीश्वरवादी म्हणतील त्यांना माझा मित्र दंतपरी-अज्ञेयवादी हे नाव देतो. असे असले तरी, जर आपल्याला खऱ्याखुऱ्या निरीश्वरवाद्यांना बाहेर पडण्यास आकर्षित करायचे असेल तर आपल्या फलकांवर लावण्यासाठी दंतपरी किंवा किटली अज्ञेयवादी यापेक्षा वेगळे नाव शोधण्याची गरज आहे.
तर, मानववादी कसा आहे? याचा एक फायदा आहे की यासंबंधी जगभर जाळे आणि सुसंघटित संस्था आणि पत्रिका आणि इतर गोष्टी आधीपासूनच अस्तित्वात आहेत, माझा प्रश्न फक्त त्यांच्यात दिसणाऱ्या मनुष्यकेंद्री विचारांवर आहे. डार्विनकडून एक गोष्ट आपण शिकलोय की मनुष्य प्रजाती लाखो जवळच्या किंवा लांबच्या चुलत प्रजातींपैकी फक्त एक आहे.
निसर्गवादी वगैरे अजुनही काही शक्यता आहेत. पण त्यातून ही काही गोंधळाचे प्रश्न उद्भवतात कारण डार्विनने निसर्गवादी शब्दाचा विचार केला असेल, निसर्गवादी म्हणजे, नक्कीच, चमत्कारवादीच्या विरुद्ध अर्थाने. आणि कधी कधी तो वापरलाही जातो, पण डार्विन निसर्गवादी शब्दाच्या दुसर्या प्रकारच्या अर्थाने गोंधळात टाकले असते, आणि तो गोंधळात पडलाही होता आणि मला वाटते इतरही असे लोक असतील जे निसर्गवादी म्हणजे नग्नतावादी असा गोंधळ करून घेतील. (हशा) हे लोक म्हणजे ब्रिटीश गावगुंडांसारखे काही ज्यांनी गेल्यावर्षी एका बालरोगतज्ञावर हल्ला केला, बालरोगतज्ञचा(पेडिट्रीशियन) अर्थ बाल-लैंगिक-शोषक(पेडोफाईल) असा वाटून. (हशा)
माझ्या विचारांप्रमाणे निरीश्वरवादासाठी दुसरा पर्याय म्हणजे साधा-सरळ नास्तिक आहे, यातून असा अर्थ निघत नाही की देव नक्की नाहीच आणि त्याचा चहा-किटली आणि दंतपरी अज्ञेय स्विकार करतील. तो भौतिकशास्त्रज्ञांच्या देवाशी संपूर्णपणे अनुरूप आहे. जेव्हा लोक -- जेव्हा निरीश्वरवादी जसे की स्टिफन हॉकिंग आणि अलबर्ट आईस्टाईन 'देव' हा शब्द वापरतात, ते नक्की तो भौतिकशास्त्रातील अशा खोल गुढ भागांसाठी उपमा म्हणून वापरतात जे आपल्याला अजुन कळलेले नाहीत. नास्तिक त्या सगळ्यासाठी चालेल, आणि त्याला निरीश्वरवाद शब्दाप्रमाणे घृणात्मक किंवा माथेफिरू प्रत्युत्तरही मिळणार नाही पण मला वाटते, खरेतर, पर्यायी शब्दात निरीश्वरवाद शब्दासारखी चीड असावी, कारण तो एक निषिद्ध शब्द आहे जो माथेफिरू भीतीचा मानसिक थरार दर्शवतो. निरीश्वरवाद शब्दाने नास्तिक किंवा तशाच दुसर्या भडक नसलेल्या शब्दासारखी पुरेशी सदस्यसंख्या प्राप्त करणे बहुधा अवघड आहे. पण जर आपण ते निरीश्वरवाद या भितीदायक शब्दानेच तसे करू शकलो तर त्याचा राजकीय परिणाम अजुनही जास्त असेल.
आता मी म्हणालो, जर मी धार्मिक असतो तर, मी उत्क्रांतीला प्रचंड घाबरलो असतो. मी त्याही पुढे जाईन. मी जर व्यवस्थित कळू शकणाऱ्या संपूर्ण विज्ञानालाच घाबरेन. आणि त्याचे कारण म्हणजे विज्ञानाची विश्वदृष्टी धार्मिक कल्पनांच्या दरिद्री हत्यारांपेक्षा बरीच जास्त थरारक, जास्त काव्यमय, आणि खळाळत्या आश्चर्याने जास्त भरलेली आहे. आणखी एक मृत नायक, कार्ल सगान, यांनी म्हणल्याप्रमाणे, "असे का आहे की कोणत्याही मुख्य धर्मांनी विज्ञानकाडे पाहून असा निष्कर्ष काढला नाही की 'आपण विचार केला त्या पेक्षा हे जास्त चांगले आहे. आपल्या प्रेषिताने सांगितल्यापेक्षा विश्व जास्त मोठे आहे, अती प्रचंड, जास्त मार्मिक, जास्त सुंदर'? त्याऐवजी ते म्हणतात, 'नाही, नाही नाही! माझा देव छोटासा देव आहे, आणि मला तो तसाच राहू द्यायचा आहे.' एखादा धर्म, जुना किंवा नवीन, जो आधुनिक विज्ञानाने उघड केल्याप्रमाणे विश्वाच्या भव्यतेचे महत्त्व सांगेल तो पारंपरिक श्रद्धांवर मिळणाऱ्या आदरापेक्षा जास्त आदर आणि दरारा मिळवू शकेल."
येथील प्रेक्षकवर्ग एक वरच्या वर्गातील आहे, आणि त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की तुमच्यातील १० टक्के लोक धार्मिक असतील. आणि तुमच्यातील बरेच लोक ही नम्र सांस्कृतिक शिकवण पाळत असतील की आपण धर्माबद्दल आदर दाखवला पाहिजे, पण माझा असाही संशय आहे की त्यातील बरेच असे असतील ज्यांना धर्माचा माझ्याइतकाच तिरस्कार आहे. (हशा) जर तुम्ही त्यापैकी एक असाल, आणि नक्कीच तुमच्यातील जास्त लोक नसतील, पण जर तुम्ही असाल, तर मी तुम्हाला नम्रपणा सोडून देण्यास सांगेन, बाहेर पडा आणि तसे बोला, तुम्ही जर श्रीमंत असाल, तर तुम्ही कशा प्रकारे बदल करू शकता याबद्दल विचार करा. या देशातील धार्मिक आघाडी विविध संस्थांकडून प्रचंड पैसा मिळवते, करातील सवलतीबद्दल बोलणे तर सोडाच, टेंपलटन संस्था आणि डिसकव्हरी इंस्टिट्युट वगैरे संस्थांकडून आपल्याला गरज आहे टेंपलटन-विरुद्धच्या संस्थांची. जर माझी पुस्तके, फक्त रिचर्ड डॉकिन्सच्या पुस्तकांसारखी खपण्याऐवजी स्टीफन हॉकिंगच्या पुस्तकांप्रमाणे खपली असती, तर माझे मीच तसे केले असते.
लोक नेहमी विचारत असतात, "सप्टेंबर ११ तारखेच्या घटनेने तुम्हाला कसे बदलले आहे?", मला त्या घटनेने असे बदलले आहे. आपण सर्व (धर्माविषयी) इतके आदरपूर्वक वागणे थांबवूया.
You can share this video by copying this HTML to your clipboard and pasting into your blog or web page. This video will play with subtitles.
You either have JavaScript turned off or have an old version of the Adobe Flash Player. To view this rating widget you
need to get the latest Flash player.
If your browser allows only "trusted sites" to execute Javascript, you should add the "googleapis.com" domain to your whitelist to allow our Flash detection to work properly.
Got an idea, question, or debate inspired by this talk? Start a TED Conversation, or join one of these:
रिचर्ड डॉकिन्स सर्व निरीश्वरवाद्यांना प्रवृत्त करतायत त्यांचे विचार खुलेपणाने मांडण्यास -- आणि चर्चने (धर्माने) राजकारणावर आणि विज्ञानावर केलेल्या अतिक्रमणाचा सामना करण्यास. एक धगधगणारे, मजेशीर, ताकदवान भाषण.
Oxford professor Richard Dawkins has helped steer evolutionary science into the 21st century, and his concept of the "meme" contextualized the spread of ideas in the information age. In recent years, his devastating critique of religion has made him a leading figure in the New Atheism. Full bio »
Translated into Marathi by Pratik Dixit
Reviewed by Saurabh Deshpande
Comments? Please email the translators above.
16:32 Posted: Jul 2006
Views 1,191,713 | Comments 712
24:45 Posted: Jul 2006
Views 665,991 | Comments 713
13:25 Posted: Nov 2006
Views 1,801,868 | Comments 379
Just follow the guidelines outlined under our Creative Commons license.
This comment will be attributed to . Not ? Sign Out.