तर, मी दाखवणार आहे एक अलिकडचा अध्याय भारतातल्या कदाचित जगातील सर्वात प्रदीर्घ सोप ऑपेरा चा, जो आहे क्रिकेट. आणि हा कायम चालू रहावा, कारण माझ्यासारख्या लोकांची रोजीरोटी त्यावर चालते. एका सर्वसाधारण सोप ऑपेरा मध्ये असावं असं सर्वकाही यात आहे. यात आहे प्रेम, आनंद, खुशी, दुखः, अश्रू, हसू, भरपूर लबाडी, कारस्थान. आणि सगळ्या चांगल्या मालिकांप्रमाणं तेही अचानक २० वर्षं उडी घेतं प्रेक्षकांच्या आवडीतील बदलानुसार. आणि अगदी तेच क्रिकेटनं केलं आहे. तो २० वर्षं पुढं गेला २० षटकांचा खेळ म्हणून. आणि त्याबद्दलच मी बोलणार आहे, कसा एक छोटासा बदल, खूप मोठ्या क्रांतीचा मार्ग दाखवतो.
पण नेहमीच असं नव्हतं. क्रिकेट नेहमीच नव्हता असा वेगवान पिढ्यांचा खेळ. एक काळ होता जेव्हा क्रिकेट खेळलं जायचं, वेळेचं बंधन नसणारे कसोटी सामने खेळले जायचे, जेव्हा खेळ संपेपर्यंत खेळतच रहायचे. आणि हा मार्च १९३९ मधील सामना तीन मार्चला जो सुरु झाला आणि चौदा मार्चला संपला. आणि संपला तोही इंग्रज खेळाडूंना डर्बनहून केप टाऊनला जायचं होतं म्हणून, जो दोन तासांचा रेल्वे प्रवास आहे, १७ला निघणारं जहाज पकडण्यासाठी, कारण दीर्घ काळासाठी पुढचं जहाज नव्हतं. त्यामुळं, तो सामना मध्येच संपवला गेला. आणि त्यातला एक इंग्रज फलंदाज म्हणाला, "माहितीये का? आणखीन अर्धा-एक तास आणि आम्ही जिंकलो असतो." (हशा) अजून अर्धा-एक तास, १२ दिवसांनी. त्यामध्ये दोन रविवार आले. पण अर्थातच रविवार हा चर्चचा दिवस. त्यामुळं रविवारी खेळायचं नाही. आणि एक दिवस पाऊस पडला. म्हणून, ते सारे एकमेकांशी गप्पाटप्पा करत बसून राहिले.
पण भारत क्रिकेटच्या प्रेमात पडण्याचं एक कारण आहे. कारण आमच्या आयुष्याचा वेग जवळपास क्रिकेटसारखाच होता. (हशा) महाभारतही असंच होतं, नाही का? दिवसा युद्ध करायचं. मग सूर्यास्त होणार, म्हणून सगळे घरी परतणार. आणि मग डावपेच बनवायचे, आणि दुसर्या दिवशी परत यायचं, आणि परत घरी जायचं. महाभारत आणि आपलं क्रिकेट यांमध्ये एकच फरक होता की क्रिकेटमध्ये सगळे जिवंत रहायचे, दुसऱ्या दिवशी परत येऊन लढण्यासाठी. राजपुत्रांनी या खेळाला आश्रय दिला, खेळावरच्या प्रेमामुळं नव्हे, तर एक साधन म्हणून, जवळीक साधायचं इंग्रज राज्यकर्त्यांशी.
पण भारतीय क्रिकेटच्या प्रेमात पडण्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे, फक्त एक लाकडाची फळी आणि एक रबराचा चेंडू, आणि कितीही भिडू मिळून कुठंही खेळू शकत होते. हे बघा. ढिगाऱ्यावर खेळता येई काही दगडांजवळ. छोट्या दोस्तांसोबत खेळता येई. कुठंही स्क्वेअर मारता यायचा नाही, कारण बॅट भिंतीवर आपटे. एअर कंडीशनिंग आणि केबल वायर्स विसरु नका. (हशा) गंगेच्या किनारी खेळता येई. गंगेप्रमाणंच पूर्वापार स्वच्छ असा खेळ आहे हा. किंवा जमिनीच्या एका छोट्या तुकड्यावर अनेक खेळ खेळता यायचे, अगदी आपण नक्की कुठल्या खेळात आहोत हे कळत नसलं तरी. (हशा) तर अशा पद्धतीनं, हा कुठंही खेळता येतो. पण हळू-हळू हा खेळ पुढं सरकला, तुम्हाला माहिती आहे, शेवटी.
नेहमी पाच दिवस मिळतीलच असं नाही. म्हणून, आम्ही पुढं गेलो, आणि आम्ही ५० षटकांचं क्रिकेट खेळायला सुरवात केली. आणि मग एक प्रचंड अपघात झाला. भारतीय खेळात, आम्ही काहिही घडवून आणत नाही. अपघात होतात आणि आम्ही फक्त योग्य वेळी योग्य ठिकाणी हजर असतो, कधी-कधी. आणि आम्ही १९८३ चा विश्वचषक जिंकला. आणि एकदम आम्ही ५० षटकांच्या सामन्याच्या प्रेमात पडलो. आणि आम्ही अक्षरशः दररोज खेळू लागलो. इतर कुठंही नसेल इतकं ५० षटकांचं क्रिकेट इथं होतं.
पण अजून एक मोठा दिवस होता. १९८३ साली आम्ही विश्वचषक जिंकला. १९९१, '९२, आम्हाला एक अर्थमंत्री मिळाला आणि एक पंतप्रधान ज्यांची इच्छा होती की जगाचं लक्ष भारताकडं वेधण्याची, एक गूढ महाकाय देश म्हणून राहण्यापेक्षा आणि रहस्यं दडवून ठेवण्यापेक्षा, आणि म्हणून आम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात येऊ दिलं. आम्ही जकात कर घटवला. आम्ही आयात कर कमी केला. आणि सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा ओघ सुरु झाला, बहुराष्ट्रीय बजेटसह, ज्यांना महत्त्व होतं दरडोई उत्पन्नाचं आणि जे भारतातल्या शक्यतांविषयी खूप उत्तेजित झाले, आणि प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचण्याचं एक साधन शोधू लागले.
आणि भारतात अशी फक्त दोन साधने आहेत, एक वास्तव, एक कल्पित. कल्पित साधन म्हणजे जे चित्रपटांतून दिसतं. वास्तव साधन म्हणजे क्रिकेट. आणि म्हणून माझे एक मित्र जे इथं माझ्यासमोर बसलेत, पेप्सीचे रवी तारीवाल, त्यांनी ठरवलं ह्या खेळाला उचलून धरायचं जगभरात. आणि पेप्सी ही मोठी क्रांती होती. कारण त्यांनी क्रिकेटला सर्वत्र पोचवायला सुरवात केली. आणि म्हणून क्रिकेट मोठं होण्यास सुरवात झाली. क्रिकेट धनिकांना आकृष्ट करु लागलं. दूरदर्शन क्रिकेटचं प्रसारण करु लागलं. दीर्घ काळासाठी दूरदर्शन म्हणायचं, "आम्ही क्रिकेट प्रसारण करणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यासाठी पैसे मोजत नाही." मग ते म्हणाले, "ठीकाय, पुढच्या प्रक्षेपण अधिकारांची किंमत असेल ५५ दशलक्ष डॉलर्स. त्यापुढचे अधिकार ६१२ दशलक्ष डॉलर्स." तर, तो एक लहानसा टप्पा होता.
आणि मग आमच्या क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा अपघात झाला. इंग्लंडनं २० षटकांच्या क्रिकेटचा शोध लावला, आणि म्हणालं, "जगानं २० षटकांचं क्रिकेट खेळलंच पाहिजे." अगदी जसं इंग्रजांनी क्रिकेटचा शोध लावला, आणि इतर जगाला तो खेळायला लावला. त्यासाठी ईश्वराचे आभार. (हशा) आणि म्हणून, भारताला टी-२० विश्वचषक खेळायला जावं लागलं, बरं का. भारताला टी-२० विश्वचषकात खेळायचं नव्हतं. पण आम्हाला ८-१ मताधिक्यानं जबरदस्ती खेळायला लावलं. आणि मग खूप नात्यमयरीत्या काहीतरी घडलं. आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो, आणि मग हा क्षण, जो चिरकाल हृदयात जतन राहील, प्रत्येकाच्या, बघा बरं.
पाकिस्तानी फलंदाज क्षेत्ररक्षकाला चुकवण्याचा प्रयत्न करताना.
समालोचक: आणि श्रीशांतनं झेल घेतला! भारताचा विजय! ट्वेंटी२० च्या फायनलचा अप्रतिम सामना. भारत, विश्वविजेता. (आनंदाचा जयघोष) भारत, टी२० विजेता. पण काय सामना होता ना, एम एस धोनी नं हवेत उडवला, पण मिस्बाह-उल-हक़, काय खेळाडू आहे! एक प्रचंड मोठा विजय. भारत, २०-२०चा विश्वविजेता.
हर्षा भोगले: अचानक भारताला २०-ओव्हर्स क्रिकेटच्या ताकदीचा साक्षात्कार झाला. अपघात असा की, त्या फलंदाजाला वाटलं गोलंदाज वेगात गोलंदाजी करेल. (हशा) त्यानं वेगानं बॉल टाकला असता, तर तो जिथं घालवायचा होता तिथं गेलाच असता, पण तो नाही गेला. आणि आम्हाला अचानक साक्षात्कार झाला की आम्ही हा खेळ चांगला खेळू शकतो. आणि यातून अजून काय झालं तर एक अभिमानाची लाट उफाळून आली की भारत जगातील सर्वोत्तम बनू शकतो. तो काळ होता, गुंतवणुकी येण्याचा, भारताला स्वतःबद्दल थोडासा अधिक विश्वास वाटत होता. आणि त्यामुळं एक भावना निर्माण झाली खूप अभिमानाची आम्ही जे करू शकतो त्याबद्दल. आणि आपल्या सर्वांच्या भल्यासाठी, इंग्रज शोध लावण्यात खूप चांगले आहेत. आणि मग ते महान लोक, जगाला त्यात चांगलं बनू देतात. (हशा) आणि म्हणून इंग्लंडनं टी-२० क्रिकेटचा शोध लावला, आणि भारताला त्यावर कब्जा करू दिला. औषधांच्या री-इंजिनिअरींग सारखं न करता, आम्ही ते सरळ सर आहे तसं उचललं. (हशा)
आणि मग, आम्ही आमच्या स्वतःची टी-२० लीग काढली. सहा आठवडे, एक शहर विरुद्ध दुसरं शहर. आमच्यासाठी हे काहितरी नवीन होतं. आम्ही आमच्या देशासाठी उभे राहिलोत - फक्त दोन प्रसंगांमध्ये ज्यांत भारताबद्दलचा प्रचंड अभिमान घेऊन मैदानात उतरतो. एक म्हणजे युद्ध, भारतीय सैन्य, जे नेहमी नेहमी होऊ नये असं आम्हाला वाटतं. दुसरं म्हणजे भारतीय क्रिकेट. आता, अचानक आम्हाला शहर पातळीवरील संघांना पाठिंबा द्यायचा होता. पण या सिटी लीग्ज मध्ये सहभागी होणार्या लोकांनी पश्चिमेचं सहाय्य घेतलं होतं. अमेरीका लीग्ज चं माहेर आहे. आणि ते म्हणाले, "तर, आम्ही भारतात जरा भारी लीग्ज उभारुन देतो." पण भारत यासाठी तयार होता का? कारण भारतात क्रिकेट हे नेहमी आयोजित केलं जात होतं. त्याचं प्रकटीकरण नव्हतं. त्याची विक्रीही नव्हती, ते आयोजित केलं जात होतं. आणि बघा त्यांनी काय केलं आमच्या सुंदर, छानशा, साध्या कौटुंबिक खेळाचं. अचानक हे सगळं घडून आलं.
उदघाटन समारंभ - दुसऱ्या कार्यक्रमांच्या तोडीस तोड. हाच तो भारत, 'कॉर्व्हेट्स' खरेदी करणारा. हाच तो भारत, 'जग्वार' खरेदी करणारा. हाच तो भारत, जिथं मोबाईल फोन्सच्या संख्येची मासिक वाढ न्यूझीलंडच्या लोकसंख्येच्या दुपटीहून अधिक होती. असा हा वेगळा भारत होता. पण हाच भारत थोडा अधिक रुढीप्रिय होता ज्याला आधुनिक तर बनायचं होतं, पण हे लोकांना कळूही द्यायचं नव्हतं. म्हणूनच ते झाले विस्मयचकीत, जेव्हा आल्या 'चीअरलीडर्स'. सगळ्यांनी त्यांना गुपचुप निरखलं. पण, 'आपण नाही बुवा' असं म्हणत.
भारतीय क्रिकेटचे नवीन मालक, आता जुन्या काळातले राजपुत्र नव्हते. ते नोकरशहा नव्हते, ज्यांना ढकललं जाई खेळामध्ये, त्यावर खरं प्रेम नसल्यामुळंच, हे लोक प्रतिथयश कंपन्या चालवणारे होते. आणि म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर सुरु केला क्रिकेटचा प्रसार , संघांच प्रचार. आणि या प्रसारासाठी ते ओतू लागले प्रचंड धनराशी. म्हणजे, आयपीएल कडं २.३ बिलियन डॉलर्स होते पहिला चेंडू फेकण्याच्याही आधी. १.६ बिलियन डॉलर्स, टीव्ही च्या १० वर्षांच्या महसूलाच्या रूपानं, आणि आणखीन ७० दशलक्ष डॉलर्स, ह्या सगळ्या फ्रँचाईजी कडून जे पैसा ओतत होते. आणि मग त्यांना त्यांच्या शहरांना आवाहन करावं लागलं. पण त्यांना ते पाश्चिमात्यांसारखं करायचं होतं, बरोबर? कारण आम्ही संघाची बांधणी करत होतो. पण त्यांनी सर्वांत भारी काम काय केलं असेल तर त्याचं लोकलायझेशन करणं. तर, तुम्हाला एक उदाहरण देतो त्यांनी हे कसं केलं त्याचं, मँचेस्टर युनायटेड स्टाईलनं नाही, तर अगदी मुंबैय्या स्टाईलनं केलेला प्रचार बघाच.
अर्थात बरेच जण म्हणाले की खेळापेक्षा यांचा नाचच चांगला आहे. (हशा) पण ते जाऊ द्या. यानं आणखीन काय केलं असेल तर, आमचा क्रिकेटकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलला. एकंदरीत, तुम्हाला एखादा तरुण खेळाडू पाहिजे असेल तर तुम्हाला तो तुमच्या स्वतःच्या भागातील गल्लीत मिळेल, तुमच्या स्वतःच्या शहरात, आणि तुम्हाला अभिमान वाटावा अशी ही व्यवस्था जिच्यातून असे क्रिकेटपटू तयार होतील. आता, अचानक, तुम्हाला जर एखादा गोलंदाज कमी पडला, उदाहरणार्थ, मुंबईला जर एखादा गोलंदाज कमी पडत असेल, त्यांना काळबादेवीला जायची गरज नाही. किवा शिवाजी पार्क किवा कुठंतरी, त्याच्या शोधार्थ, ते जाऊ शकतात त्रिनिनादला. आता हा आहे एक नवीन भारत, नाही का? हे आहे एक नवं जग. जिथं कुठुनही खेळाडू आणता येतील जोपर्यंत तुम्हाला मिळेल सर्वोत्तम वस्तू सर्वोत्तम किंमतीत. आणि एकाएकी भारतीय क्रीडाजगताला या वास्तवाची जाणीव झाली की सर्वोत्तम किमतीत सर्वोत्तम उत्पादन उपलब्ध होऊ शकतं जगातून कुठुनही.
मग, मुंबई इंडीयनवाले 'डॉन ब्राव्हो' मधून गेले त्रिनिनाद आणि टोबॅगो ला एका रात्रीत. आणि जेव्हा त्याला परतायचं होतं खेळण्यासाठी वेस्ट ईंडीज कडून, तेव्हा त्यांनी विचारलं, "तुला कधी पोचायचं आहे?" तो म्हणाला, "मला अमुक वेळेत तिथं पोचायचंय, त्यासाठी आज निघायला हवं." आम्ही म्हटलं, "ना ना. कधी निघायचं ते महत्त्वाचं नाहीच, कधी पोहोचायचं ते महत्त्वाचं आहे." आणि मग तो म्हणाला, "मला अमुक तारखेला पोचलंच पाहिजे." यावर ते म्हणाले, "छान, तू त्या तारखेच्या एक दिवस आधीपर्यंत खेळ." तर, तो हैदराबादमध्ये खेळला, सामना संपल्याबरोबर थेट मैदानावरून हैदराबाद विमानतळावर गेला, एका खाजगी कॉर्पोरेट जेटमध्ये बसला, पहिलं इंधन पोर्तुगालमध्ये भरलं, दुसरं इंधन ब्राझीलमध्ये भरलं. वेस्ट इंडिजमध्ये तो वेळेत पोहोचला. (हशा) एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतात कधीच विचार झाला नसेल. आम्ही कधीच म्हटलं नसतं, "आम्हाला एक खेळाडू हवाय एका सामन्यासाठी, आणि आम्ही एक कॉर्पोरेट जेट देऊ त्याला परत किंगस्टोन, जमैकाला जायला दुसरा सामना खेळायला." आणि मी मनातून म्हटलं, "अरेच्चा, आम्ही सुधारलो वाटतं. आम्ही काहीतरी करुन दाखवलं. आम्ही मोठा विचार करु लागलो."
पण यातून अजून काय घडलं असेल तर ते म्हणजे भारतीय क्रिकेटमधील दोन महत्त्वाच्या गोष्टींचं मिलन म्हणजे क्रिकेट आणि भारतीय मनोरंजन क्षेत्रातील सिनेमा. क्रिकेट आणि सिनेमा. आणि ते एकत्र यायचं कारण म्हणजे सिनेमातले लोक आता बनू लागले क्लबचे मालक. आणि मग, लोकांची पावलं वळली क्रिकेटकडं, प्रिती झिंटाला बघण्यासाठी. लोक क्रिकेट पाहू लागले शाहरुख खानला पाहण्यासाठी. आणि काहीतरी खूप इंटरेस्टिंग घडलं. आमच्या भारतीय क्रिकेटमध्ये नाच आणि गाणं येऊ लागलं. आणि मग ते अजून अजून हिंदी सिनेमा सारखंच वाटायला लागलं. आणि अर्थातच, तुम्ही प्रिती झिंटाच्या टीम मध्ये असाल, जसं या पुढच्या क्लिपमध्ये दाखवलंय, तुम्ही चांगलं खेळलात तर प्रिती झिंटाकडून एक आलिंगन. तर हे आहे चांगल्या खेळामागचं खरं कारण. बघा तर खरं. सर्वांच्या नजरा प्रिती झिंटावर.
आणि अर्थातच कोलकत्याच्या लोकांसोबत खेळतोय शाहरुख. कोलकत्यातले सामने आपणही बघितले होते, पण असं काहीतरी कधीच दिसलं नव्हतं. शाहरुख, बंगाली गाण्याच्या तालावर, सगळ्या प्रेक्षकांना नाचवतोय कोलकत्यासाठी, भारतासाठी नव्हे, तर कोलकत्यासाठी. पण जरा इकडं बघा.
एक भारतीय फिल्मस्टार मिठी मारतोय एका पाकिस्तानी खेळाडूला कारण ते जिंकले कोलकत्यात. विश्वास बसत नाही ना? आणि तुम्हाला माहितीये तो पाकिस्तानी खेळाडू काय म्हणाला? (टाळ्या) मला वाटतं मी प्रिती झिंटाच्या टीममधून खेळायला हवं होतं.
पण मी विचार केला, ही संधी साधायचा - इथं काही लोक पाकिस्तानातून आले आहेत. मला खूप आनंद वाटतो की तुम्ही इथं आलात. कारण माझ्या मते, आपण दाखवून देऊ शकतो की आपण एकत्र येऊन मैत्री करु शकतो, बरोबर? आपण एकत्र क्रिकेट खेळू शकतो, आपण मित्र बनू शकतो. तर पाकिस्तानातून इथं आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
यावर थोडी टीकाही झाली, जसं की, "खेळाडूंची खरेदी-विक्री होते? ते काय धान्य आहे? ती काय गुरं-ढोरं आहेत?" याचं कारण म्हणजे हा लिलाव. एखाद्या खेळाडूची किंमत कशी ठरवायची? आणि म्हणून नंतर झालेल्या लिलावात, लोक अक्षरशः म्हणत होते, होऊन जाऊदे! ह्या खेळाडूसाठी इतका पैसा. हे बघा.
लिलाव पुकारणारा: चालू आहे १,५००,००० डॉलर्स. चेन्नई. शेन वॉर्न विकला गेला ४५०,००० डॉलर्समध्ये.
हर्षा: अचानक, एक खेळ, ज्यातून खेळाडूंची कमाई असे ५० रुपये प्रतिदिन - म्हणजे २५० रुपये एका कसोटी सामन्याचे, पण तीच चार दिवसात संपली, तर मिळायचे फक्त २००. सर्वोत्तम भारतीय खेळाडू, जे खेळायचे सर्व कसोटी सामन्यांत, प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यांत, आघाडीचे खेळाडू, साधारण करारानुसार २२०,००० डॉलर्स, पूर्ण वर्षाचे. त्यांनाच मिळू लागले ५००,००० सहा दिवसांच्या कामाचे मग अँड्र्यु फ्लिंटॉफ आला, इंग्लंडहून, त्याला मिळाले दीड मिलियन डॉलर्स, आणि तो परत जाऊन म्हणाला, "चार आठवड्यात, मी फ्रँक लॅम्पर्ड आणि स्टीव्हन गेरार्ड पेक्षा जास्त कमावतोय, आणि माझी कमाई फुटबॉलर्स पेक्षाही जास्त आहे, व्वा." आणि कुठुन कमवलं त्यानं? भारतातल्या एका छोट्या क्लबमधून. असा एक दिवस उजाडेल याची तुम्ही कल्पना तरी केली होती का? दीड मिलियन डॉलर्स सहा आठवड्यांच्या कामासाठी. काही वाईट नाही, होय ना.
तर, २.३ बिलियन डॉलर्स, पहिला चेंडू फेकण्यापूर्वीच. यातून भारतानं आणून ठेवलं स्वतःला जगातल्या सर्वोत्तमांच्या पातळीवर, आणि बनला एक जबरदस्त ब्रँड. ललित मोदी 'बिझनेस टुडे' च्या मुखपृष्ठावर झळकले. आयपीएल भारतातला सगळ्यात मोठा ब्रँड बनला आणि, आमच्या निवडणुकांमुळं, दक्षिण आफ्रिकेत न्यावं लागलं, आणि आम्हाला तीन आठवड्यात स्पर्धा सुरु करायची होती. तीन आठवड्यांत संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत हलवायची. पण आम्ही ते केलं. कसं माहितीये? कारण कोणताही देश आमच्याइतकं संथ काम करत नाही स्पर्धेच्या तीन आठवड्यांपूर्वी पर्यंत, आणि अखेरच्या तीन आठवड्यांत आमच्याइतकं जलद कामही कुणीच करत नाही.
आमची लोकसंख्या, जी, दीर्घ काळापर्यंत आम्हाला आमची समस्या वाटत होती, एकाएकी आमची सगळ्यात मोठी संपत्ती बनली कारण खूप जास्त लोक बघत होते - प्रचंड मोठा उपभोक्ता वर्ग -- प्रत्येकजण क्रिकेट बघायला येई. आम्ही क्रिकेटला भारतातला एकमेव खेळसुद्धा बनवून टाकलं, जे चांगलं नाही, पण भारतातला इतर कुठलाही खेळ क्रिकेटलाच मोठं होण्यासाठी ढकलतो, जी आमच्या काळाची एक शोकांतिका आहे.
आता, ह्या शेवटच्या मिनिटात, जाण्यापूर्वी - या सगळ्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत. दीर्घ काळासाठी, भारत हा देश होता गरीबांचा, धुळीचा, भिकार्यांचा, गारुड्यांचा, घाणीचा, दिल्ली बेली - इथं येण्याआधीच लोकांना 'दिल्ली बेली'च्या कथा ऐकायला मिळत. आणि, एकाएकी, या भूमीत संधीच संधी दिसू लागल्या. जगभरातले क्रिकेटपटू म्हणू लागले, "काय सांगू, आम्हाला भारत आवडतो, आम्हाला भारतात खेळायला आवडतं." आणि हे ऐकून चांगलं वाटलं. आम्ही म्हणालो, "डॉलरमध्ये खरोखर खूप ताकद आहे." माहित्येय का, डॉलर दिसायला लागले आणि मग दिल्ली बेली वगैरे काहीच नाही. अजिबात घाण नाही, भिकारी नाहीत. सगळे गारुडी गायब झाले. सगळे गुडुप. यातून तुम्हाला दिसेल भांडवलशाही कशी चालते.
तर, शेवटी, एक इंग्लिश खेळ, जो भारतानं बळकावला, थोडासा, पण टी-२० हा भविष्यातला धर्मप्रसारक होणार आहे. या खेळाचा प्रसार जगभर करायचा असेल तर, तो छोट्यातला छोट्या स्वरुपात असला पाहिजे. चीनमध्ये, एखादी प्रदीर्घ कसोटी खेळवून, १४ दिवस निकालाशिवाय बसून राहणं शक्य नाही, किंवा अशा खेळाचा जगभर प्रसार शक्य नाही. आणि तेच टी-२० करतंय. आशा करुयात की हे सर्वांना अधिक श्रीमंत बनवेल, खेळाला अजून मोठं बनवेल आणि कदाचित त्यामुळं क्रिकेट समालोचकांना अधिक वेळ देता येईल या व्यवसायासाठी.
You can share this video by copying this HTML to your clipboard and pasting into your blog or web page. This video will play with subtitles.
You either have JavaScript turned off or have an old version of the Adobe Flash Player. To view this rating widget you
need to get the latest Flash player.
If your browser allows only "trusted sites" to execute Javascript, you should add the "googleapis.com" domain to your whitelist to allow our Flash detection to work properly.
Got an idea, question, or debate inspired by this talk? Start a TED Conversation.
एका वैश्विक संस्कृतीतील संकल्पनेची कहाणीः क्रिकेट समालोचक हर्षा भोगले बोलताहेत जलद गती २०-२० क्रिकेटच्या नेत्रदीपक आगमनाबद्दल, जे आधुनिक भारताच्या उदयाला समांतर आहे. या खेळाच्या धूसर इंग्रजी मुळांपासून सध्याचे सेलिब्रिटी ओनर व खेळाडूंची लक्षावधी डॉलर्सची कॉन्ट्रॅक्ट्स इथपर्यंतचा त्यांनी घेतलेला मागोवा.
Harsha Bhogle can talk about the business side of cricket, the technicalities of play and the psychology of the players with equal authority. Full bio »
Translated into Marathi by Milind Ektare
Reviewed by Manali Ektare
Comments? Please email the translators above.
19:01 Posted: Jan 2007
Views 643,630 | Comments 86
15:50 Posted: Nov 2009
Views 1,078,882 | Comments 261
04:28 Posted: Dec 2009
Views 172,496 | Comments 158
Just follow the guidelines outlined under our Creative Commons license.
This comment will be attributed to . Not ? Sign Out.