मी एक कथाकार आहे. तेच करते मी आयुष्यात - गोष्टी सांगते, कादंबर्या लिहिते. आणि आज मला काही गोष्टी सांगायच्या आहेत, कथाकथनाच्या कलेविषयी, आणि जिनी नावाच्या मायावी राक्षसांविषयी. पण तिकडे वळण्यापूर्वी माझ्या स्वतःच्याच गोष्टीची एक झलक मला दाखवायची आहे हे मी अर्थातच शब्दांतून व्यक्त करेन, आणि एका आकारातूनही, तो म्हणजे वर्तुळ. त्यामुळे माझ्या संपूर्ण भाषणात तुम्हाला बरीच वर्तुळं सापडतील.
फ्रान्समधल्या स्ट्रॉसबर्गमध्ये तुर्की आई-वडिलांपोटी माझा जन्म झाला. त्यानंतर थोड्याच कालावधीत माझे आई-वडील वेगळे झाले आणि मी माझ्या आईबरोबर तुर्कस्तानला आले. तेव्हापासून एकट्या आईने एकुलत्या मला वाढवलं. आता १९७० च्या काळातल्या अंकारामध्ये ते थोडं जगावेगळं होतं. आमच्या शेजारी बरीच मोठी कुटंबं राहायची, ज्यांच्यामध्ये वडील हेच प्रमुख असायचे. त्यामुळे मी मोठं होताना माझ्या आईला पितृसत्ताक वातावरणात एक घटस्फोटिता म्हणून पाहिलेलं आहे. खरंतर मी मोठं होताना दोन वेगळ्या प्रकारच्या स्त्रिया पाहिल्या. एका बाजूला होती माझी आई, सुशिक्षित, धर्मनिरपेक्ष, आधुनिक, पाश्चात्य विचारसरणीची तुर्की स्त्री दुसर्या बाजूला होती माझी आजी, माझं हवं-नको बघणारी, थोडी जास्त धार्मिक, कमी शिकलेली आणि नक्कीच कमी बुध्दिवादी असणारी. ती कॉफीपूड पाहून भविष्यं सांगायची आणि वाईट नजरेवर उतारा म्हणून शिसं गूढ आकारात वितळवून द्यायची.
माझ्या आजीकडे लोकांचा राबता असायचा, चेहर्यावरच्या मुरुमांनी त्रासलेल्या किंवा हातावर चामखीळ असणार्या लोकांचा. दरवेळेला माझी आजी अरबीमध्ये काही मंत्र म्हणायची, एक लाल सफरचंद घ्यायची आणि जितके चामखीळ काढायचे असतील तितके गुलाबाचे काटे त्याला टोचायची. त्यानंतर एकेका काट्याभोवती गडद शाईने ती वर्तुळ काढायची. एका आठवड्याने रोगी परत तपासणीला येई. आता मला माहीत आहे की मी विद्वानांच्या आणि शास्त्रज्ञांच्या समोर असं बोलू नये, पण खरं सांगायचं तर माझ्या आजीला जे लोक त्वचाविकारांसाठी भेटायला यायचे त्यातल्या कुणालाही मी दु:खी किंवा गुण न येताच परत जाताना असं पाहिलेलं नाही. मी विचारलं तिला, की ती कसं काय करते हे. ही प्रार्थनेची शक्ती म्हणायची का? उत्तरादाखल तिनं सांगितलं, '' हो, प्रार्थनेचा गुण तर आहेच, पण वर्तुळांमध्ये देखील शक्ती असते बरं."
बाकीच्या बर्याच गोष्टींबरोबरच एक मोलाचा धडा शिकले मी तिच्याकडून. तुम्हाला जर आयुष्यात एखादी गोष्ट नष्ट करायची असेल ना, मग ते मुरूम असो, एखादा डाग असो, किंवा मानवी आत्मा असो, तर त्याच्या भोवती एक भक्कम तटबंदी उभारायची. वठून जाईल तो आतल्याआत. आता आपण सगळे कुठल्या ना कुठल्या सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात राहतो. आपण सगळेच. आपला जन्म एखाद्या विशिष्ट कुटुंबात, देशात, सामाजिक वर्गात होतो. पण जर आपण हे आपलं सवयीचं जग सोडून बाहेरच्या जगाशी संबंध ठेवले नाहीत तर धोका हा आहे की आपणही आतल्याआत वठून जाऊ. आपली कल्पनाशक्ती खुरटत जाईल. आपली मनं आकसत जातील. आणि आपण असेच आपल्या सांस्कृतिक कोशात खूप जास्त काळ राहिलो ना तर आपली माणुसकीदेखील आटून जाईल. जर आपले मित्र, शेजारी, सहकारी, कुटुंब अशी सगळी जवळची माणसं आपल्याच सारखी असतील, तर त्याचा अर्थ आपल्याभोवती आपल्या प्रतिबिंबांचीच गर्दी झालेली आहे.
आता माझ्या आजीसारख्या तुर्कस्तानातल्या बायका अजून एक गोष्ट करतात, त्या आरसे मखमलीने झाकून तरी टाकतात किंवा भिंतीवर पाठमोरे तरी टांगतात. पद्धत आहे ही एक पूर्वेकडची, तिच्या मागचा समज असा की माणसाने फार वेळ स्वतःचं प्रतिबिंब बघत राहणं बरं नव्हे. विसंगती खरी, पण आजच्या जागतिकीकरणाच्या काळाचा एक मोठा धोका हा आहे की एकसारखाच विचार करण्यार्या लोकांनी आपापली कोंडाळी करून राहणं. आणि हे सगळीकडे होतं आहे, उदारमतवादी आणि सनातनी यांच्यात, अज्ञेयवादी आणि आस्तिकांच्यात,श्रीमंत आणि गरीबांच्यात, तसंच पूर्व आणि पश्चिमेतही. आपला कल असतो काही सारखेपणा दिसला की गट बनवण्याकडे, आणि नंतर दुसर्या गटातल्या लोकांबद्द्ल सरसकट पूर्वग्रह बनत जातात. माझ्या मते हा सांस्कृतिक विळखा पार करण्याचा एक मार्ग म्हणजे कथाकथन, साहित्यकला. कथाकहाण्या काही तट धुळीला मिळवू शकत नाहीत, पण त्या आपल्या मानसिक भिंतींत भगदाडं पाडू शकतात. आणि याच भगदाडांतून आपण बाहेरची झलक पाहू शकतो, आणि कधीकधी तो देखावा आपल्याला आवडतोसुध्दा.
मी आठ वर्षांची होते तेंव्हा लिहायला सुरुवात केली. एके दिवशी माझी आई एक मोरचुदी [रंगाची] वही घेऊन घरी आली आणि म्हणाली की मला माझ्या वैयक्तिक नोंदी ठेवायला आवडतील का? मागे वळून पहाताना, मला असं वाटतंय की तिला जराशी काळजी वाटत असावी माझं डोकं ताळ्यावर असण्याची. चांगली गोष्ट अशी की मी कायम घरी गोष्टी सांगत असायचे. फक्त विचित्र इतकंच होतं की मी माझ्या आसपास असणार्या काल्पनिक मित्रांना गोष्टी सांगायचे. मी इतकी एकलकोंडी होते की रंगीत खडूंशी बोलायचे आणि वस्तूंना धडकल्यावर त्यांची माफी मागायचे. त्यामुळे आईला असं वाटलं की माझ्या रोजच्या अनुभवांना, भावनांना वहीत उतरवले तर बरं होईल. पण तिला काय कल्पना की मला माझं आयुष्य प्रचंड कंटाळवाणं वाटायचं आणि स्वतःबद्द्ल लिहायला तर मला अजिबातच आवडत नव्हतं. त्याऐवजी मी लिहायला सुरूवात केली ती बाकीच्या लोकांविषयी आणि अशा घटनांबद्द्ल ज्या मुळात कधी घडल्याच नव्हत्या. गोष्टी लिहिणं हे जे माझा आयुष्यभर जीव-की-प्राण बनलंय, त्याची सुरूवात ही अशी झाली. त्यामुळे अगदी सुरवातीपासूनच साहित्य हे माझ्यासाठी आत्मप्रकटीकरण नसून दुसर्यांच्या आयुष्यात डोकावायची, बाकीच्या शक्यता चाचपून पहाण्याची गोष्ट होती. आता थोडा धीर धरा, मी इथे एक वर्तुळ रेखाटतेय आणि नंतर या मुद्याकडे परत येईन मी.
आता त्याच वेळी अजून एक झालं. माझ्या आईला राजनैतिक अधिकारी म्हणून काम मिळालं. त्यामुळे माझ्या आजीच्या छोट्याशा, अंधश्रध्दाळू, मध्यमवर्गीय वातावरणातून माझी रवानगी थेट [माद्रिदमधल्या] एका चकाचक आंतरराष्ट्रीय शाळेत झाली, जिथे तुर्की मी एकटीच होते. ज्या प्रकाराला मी "प्रातिनिधिक परदेशी" म्हणते, त्याचा मला आलेला हा पहिला अनुभव. आमच्या वर्गात सगळ्याच देशांची मुलं होती. पण या विविधतेतून वर्गात बहुरंगी, समताधिष्ठित लोकशाही वगैरे काही आली नाही. त्याऐवजी असं वातावरण तयार झालं की ज्यात प्रत्येक मूल हे फक्त मूल न राहता त्यापेक्षा काहीतरी मोठ्या गोष्टींचं प्रतीक बनलं. आम्ही म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचीच छोटी आवृत्ती होतो, यात मजा यायची. पण जोपर्यंत एखाद्या देशाच्या किंवा धर्माच्या बाबत काही वाईट घडत नसे तोपर्यंतच. असं काही झालं तर मग ते मूल ज्या देशाचं किंवा धर्माचं असायचं, त्याची चेष्टा करून, टिंगल करून त्याला जीव नकोसा करून टाकायचे. मला याचा चांगलाच अनुभव आहे, कारण मी शाळेत असताना माझ्या देशात सैन्यानं सत्ता बळकावली, माझ्या एका देशबांधवानं पोपवर प्राणघातक हल्ला केला, आणि तुर्कस्थानला गाण्याच्या युरोव्हिजन स्पर्धेत भोपळा मिळाला. (हशा)
त्या दिवसांत मी शाळा चुकवायचे बर्याचदा आणि स्वप्नं बघायचे, खलाशी व्हायची. मला सांस्कृतिक पूर्वग्रहांची ओळखसुध्दा पहिल्यांदा तिथेच झाली. बाकीची मुलं मला "मिडनाईट एक्स्प्रेस" चित्रपटाबद्दल विचारायची, जो मी पाहिलेलाच नव्हता. मी किती सिगारेट ओढते याची ते चौकशी करायचे कारण सगळे तुर्की लोक प्रचंड धूम्रपान करतात असंच त्यांना वाटायचं आणि माझे केस मी केंव्हापासून झाकायला सुरवात करेन या बाबत त्यांचे तर्कवितर्क चालायचे. मला माझ्या देशाबद्दल असलेले हे तीन मोठे पूर्वग्रह हळूहळू उमगत गेले: राजकारण, सिगारेट आणि बुरखा. स्पेननंतर आम्ही गेलो जॉर्डनला, जर्मनीला आणि पुन्हा अंकाराला. प्रत्येक ठिकाणी मी गेले तेव्हा मला जाणवलं की असं कुठंही जाताना फक्त माझ्या कल्पनाशक्तीचं गाठोडंच मी बरोबर नेऊ शकते. कथांनीच माझ्या विचारांना स्थिर संदर्भ पुरवले, सातत्य दिले आणि सुसंघटितपणा आणला, नाहीतर हे तीन 'स'कार मला नसते मिळाले.
मी साधारण विशीच्या मध्यात होते जेंव्हा मी इस्तंबूलला गेले, माझ्या लाडक्या शहरात. मी रहायचे तो भाग अगदी सळसळता, रंगीबेरंगी होता. तिथं मी माझ्या बर्याचशा कादंबर्या लिहिल्या. १९९९ मधल्या भूकंपात मी इस्तंबूलमध्येच होते. रात्रीच्या ३ वाजता मी इमारतीमधून पळत बाहेर आले आणि दिसलेल्या एका दृष्याने तिथेच थबकले. तिथे एक गावातला खडूस म्हातारा दुकानदार होता - हा दारू विकायचा नाही आणि धड कुठल्याच नसलेल्या उपर्यांशी बोलायचाही नाही. तो एका तृतीयपंथी "बाई" शेजारी बसला होता तिने एक लांब काळा केसांचा टोप घातला होता आणि तिच्या गालांवरून मस्कारा ओघळत होता. मी पाहिलं की त्या माणसानं सिगारेटचं पाकीट उघडून थरथरत्या हाताने सिगारेट काढली आणि त्या व्यक्तीला दिली. आणि माझ्या मनात आजही भूकंपाच्या रात्रीचं तेच चित्र आहे -- रस्त्याच्या बाजूला एकत्र सिगारेटी ओढत बसलेले दोघं, एक जुन्या वळणाचा दुकानदार आणि एक रडणारी तृतीयपंथी. मृत्यूच्या आणि विनाशाच्या सावटाखाली असताना काही तासांसाठी का होईना पण आपले क्षुल्लक मतभेद विरून जातात आणि आपण एकत्र येतो. पण माझी अशी श्रद्धा आहे की कथांचाही असाच परिणाम होतो. मी असं नाही म्हणत की साहित्य भूकंपाच्या तोडीचा परिणाम घडवतं. पण जेंव्हा एखादी चांगली कादंबरी वाचत असताना आपण आपलं छोटंसं, सुखासीन आयुष्य मागे टाकून एकटेच रात्री बाहेर पडतो तेंव्हा ज्या लोकांना आपण कधीही भेटलेले नसतो किंवा कदाचित ज्यांच्याबद्द्ल पूर्वग्रह आहे अशा लोकांना भेटत जातो.
त्यानंतर थोड्या दिवसांनी, मी आधी बॉस्टन आणि नंतर मिशिगनमधल्या मुलींच्या महाविद्यालयात जाऊ लागले. हा बदल मला भौगोलिक बदल असा म्हणून फारसा न जाणवता भाषिक बदल म्हणून जाणवला. मी इंग्रजीमध्ये लिहायला सुरवात केली. मी स्थलांतरित, निर्वासित नव्हते किंवा देशोधडीलाही लागलेले नव्हते. मला विचारलं जायचं की मग मी असं का म्हणून करतेय. पण माझ्यासाठी, ही भाषांमधली भटकंती म्हणजे स्वतःला परत घडवायची संधी असते. मला लिहायला आवडतं ते अतिशय काव्यात्म आणि भावनिक असणार्या तुर्कीमधून. आणि अतिशय गणिती व बौध्दिक असणार्या इंग्लिशमधूनही. प्रत्येक भाषेशी माझी नाळ वेगळ्या प्रकारे जोडली गेलेली आहे. जगातल्या लाखो लोकांप्रमाणे माझ्यासाठीही इंग्लिश ही प्रयत्नपूर्वक आत्मसात केलेली भाषा आहे. जेव्हा तुम्ही एखादी भाषा उशीरा शिकायला सुरवात करता, तेव्हा होतं काय की तुम्ही कायम, सतत एक खंत बाळगून असता. एखादी भाषा उशीरा शिकणार्या लोकांना कायमच काही अधिक सांगायचं असतं, उत्तम विनोद, अधिक चांगल्या गोष्टी. पण आपण सरतेशेवटी कमीच बोलतो कारण मन आणि वाचा यात सततच एक अंतर पडलेलं असतं. ,आणि या अंतराची प्रचंड धास्ती वाटत राहते. पण जर, आपण त्याला जर जुमानायचंच नाही असं ठरवलं, तर तेच अंतर उमेद देतं. आणि मला बॉस्टनमध्ये कळालं ते हेच -- ही निराशा, तगमग उमेद वाढवणारीच होती.
आता वेळ अशी आली, की माझ्या आजीने - माझ्या आयुष्याची तर्हा पाहून तिचा जीव खालीवर होत चाललेला होता - रोज प्रार्थना करताना देवाला साकडं घालायला सुरूवात केली की माझं ताबडतोब लग्न होऊन जाऊ दे, म्हणजे माझं बस्तान बसेल एकदाचं. आणि ती देवाची लाडकी असल्याने माझं लग्न झालंही. (हशा) पण बस्तान बसण्याऐवजी मी गेले अरीझोनाला. आणि माझा नवरा इस्तंबूलमध्येच असल्यामुळे माझ्या अरीझोना ते इस्तंबूल अशा फेर्या सुरू झाल्या. जगाच्या पाठीवरच्या दोन टोकाच्या अशा या दोन जागा. वाटतं की माझ्यातला एक अंश कायमचाच भटक्या राहिलेला आहे, शरीरानेही आणि मनानेही. कथा मला सोबत करतात, माझ्या अशा अंशांना आणि स्मृतींना एकत्र गुंफतात, अस्तित्वाच्या विणीसारख्या.
जरी मला गोष्टी कितीही आवडत असल्या तरी, आताशा, मला असं वाटू लागलं आहे की त्यांची जादू हरवून जाते जर एखाद्या गोष्टीकडे फक्त गोष्ट म्हणून न पाहता वेगळ्या नजरेने पाहिलं तर. आणि मला मनापासून आवडेल या विषयावर एकत्र येऊन विचार करायला. जेव्हा माझी पहिली इंग्रजी कादंबरी अमेरिकेत प्रकाशित झाली तेव्हा तेव्हा मला एका समीक्षकाकडून एक मार्मिक शेरा ऐकायला मिळाला. तो म्हणाला ''मला आवडलं तुझं पुस्तक पण वाटलं की तू ते खरं वेगळ्या पद्धतीनं लिहायला हवं होतंस." (हशा) मी त्याला विचारलं की त्याला नक्की म्हणायचंय काय. तो म्हणाला, ''बघ हं, त्यात अनेक स्पॅनिश, अमेरिकी, दक्षिण अमेरिकी पात्रं आहेत. पण एकच पात्र तुर्की आहे आणि तोही एक पुरुष.'' आता कादंबरी घडते बोस्टनमधल्या एका विद्यापिठाच्या परिसरात, तेव्हा माझ्या मते साहजिकच त्यात दुसर्या देशांची पात्रं जास्त असणार होती तुर्की पात्रांपेक्षा. पण मला समजलं त्या समीक्षकाला काय अपेक्षित होतं ते. आणि मला हेही जाणवलं की मी त्याचा अपेक्षाभंग करत रहाणार आहे. त्याला माझ्या [तुर्की] अस्मितेचे प्रतिबिंब अपेक्षित होतं. तो पुस्तकात एक तुर्की स्त्री शोधत होता कारण [लिहिणारी] मी [तुर्की स्त्रीच] होते.
साहित्यामुळे जग कसं बदलतं याविषयी आपण कायम बोलतो. पण आपण हे ही बघायला हवं की खुज्या अस्मितांच्या राजकारणांमुळे साहित्याच्या प्रसारावर, वाचनावर आणि समीक्षेवर कायकाय परिणाम होतो. खूप लेखकांना याचं दडपण येतं, पण पाश्चात्येतर लेखकांना ते जास्त करून जाणवतं. आता जर तुम्ही मुस्लीम जगातून आलेल्या एक लेखिका असाल, माझ्यासारख्या, तर अपेक्षा अशी असते की तुम्ही मुस्लीम स्त्रियांबद्दलच लिहावं, आणि त्यातही, दु:खी मुस्लीम स्त्रियांच्या दर्दभर्या कहाण्या पाडाव्या. अपेक्षा अशी असते की तुम्ही तपशीलवार, करूण आणि व्यवच्छेदक लिखाण करावं आणि प्रायोगिक किंवा नव्या मुशी घडवणारं लिखाण तुमच्या पाश्चात्य सहकार्यांवर सोडून द्यावं. लहान असताना जे काही मी अनुभवलं माद्रिदमधल्या शाळेत, तेच चाललंय साहित्यविश्वात आज. लेखकांकडे स्वयंभू, सर्जनशील व्यक्ती म्हणून न पाहता त्यांच्याच संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून पाहिलं जातंय. चीन मधले मूठभर लेखक, मूठभर तुर्कस्थानातले आणि मूठभर नायजेरियामधले. अशी कल्पना असते की आम्हा सगळ्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असणार, ते नसेल, तर काहीतरी वेगळं तरी.
लेखक आणि मुशाफिर जेम्स बाल्डविनने १९८४ मध्ये एक मुलाखत दिलेली, त्यात त्याला सतत त्याच्या समलैंगिकतेविषयीच विचारत होते. जेव्हा मुलाखत घेणारा त्याला एक समलिंगी लेखक अशा चौकटीत कोंबायला धडपडू लागला तेव्हा बाल्डविन थांबला आणि म्हणाला, ''पण तुला दिसत नाहीये का? माझ्यात जगावेगळं असं काहीच नाहीये आणि बाकी लोकांच्यातही असं काहीच नाहीये जे माझ्यात नाही.'' जेव्हा अस्मितांच्या राजकारणांमुळे आपल्यावर शिक्के उमटवले जातात, तेव्हा आपल्या कल्पनांचं स्वातंत्र्य धोक्यात येतं. बहुसांस्कृतिक साहित्य अशी काहीतरी धूसर वर्गवारी करून पाश्चात्य जगाबाहेरच्या सगळ्या लेखकांची एकत्र मोट त्यात बांधली जाते. दहा वर्षापूर्वीचं हार्वर्ड स्क्वेअरमधलं माझं पहिलं बहुसांस्कृतिक अभिवाचन मी कधीच विसरत नाही. तीन लेखक होतो आम्ही, एक फिलिपीन्सचा, एक तुर्की आणि एक इंडोनेशियाचा -- जसा काही विनोदच होता तो एक! (हशा) आम्हाला एकत्र आणायचं कारण हे नव्हतं की आमची शैली किंवा साहित्यिक जाणिवा सारख्या होत्या. फक्त आम्ही परकीय होतो एवढंच कारण. बहुसांस्कृतिक लेखकांनी म्हणे खर्याखुर्या गोष्टी सांगाव्यात, काल्पनिक नकोत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यामागे एक हेतू असावाच. अशा प्रकारे फक्त लेखकच नव्हे तर त्यांनी रेखाटलेली पात्रंसुध्दा कशाचीतरी प्रतीकं होऊन जातात.
पण मी हे लगेचच स्पष्ट केलेलं बरं की ही जी गोष्टीकडे फक्त एक गोष्ट म्हणून न पाहता वेगळ्या नजरेने बघायची जी वृत्ती आहे ती काही फक्त पश्चिमेकडून आलेली नाही. ती सगळीकडूनच येते. आणि माझा स्वानुभव आहे हा, माझ्यावर खटला भरला गेला होता २००५ साली, माझ्या कादंबरीतल्या कल्पित पात्रांच्या तोंडच्या शब्दांमुळे. एक सकारात्मक, बहुपदरी कादंबरी लिहायची होती मला एका आर्मेनियन आणि एका तुर्की कुटुंबाबद्दल, स्त्रियांच्या नजरेतून. पण खटल्यादरम्यान माझ्या गोष्टीबाबत पराचा कावळा करण्यात आला. काहींनी नावं ठेवली, तुर्की-आर्मेनियन संघर्षाविषयी लिहिलं म्हणून, तर काहींनी कौतुकही केलं. ण काही वेळा मला दोन्ही बाजूंना सांगावसं वाटायचं की बाबांनो, हे साहित्य आहे. एक गोष्ट आहे ही निव्वळ. आणि जेव्हा मी म्हणतेय की "निव्वळ एक गोष्ट" तेव्हा मी माझ्या कामाला कमी लेखत नाहीये. माझं साहित्यावर प्रेम आहे, मला त्यातून आनंद मिळतो, ते निखळ साहित्य म्हणून, ते कशाचंतरी साधन आहे म्हणून नाही.
लेखकांना त्यांची स्वत:ची राजकीय मतं मांडायचा हक्क आहेच, तशा चांगल्या राजकीय कादंबर्याही आहेत, पण साहित्याची भाषा ही काही व्यवहारातल्या राजकारणाची भाषा नव्हे. चेकॉव्ह म्हणाला होता, ''एखाद्या समस्येचं उत्तर आणि प्रश्न मांडायची योग्य पध्दत या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. आणि यातली केवळ दुसरी बाब ही कलाकाराची जबाबदारी आहे.'' अस्मितांच्या राजकारणांमुळे आपल्यात फूट पडते.साहित्य जोडणारं असतं. एकाला सरसकट मतं बनवायची हौस असते, तर दुसर्याला तरल फरकही भावतात. एक सीमा आखणारं. दुसरं असीम. अस्मितेचं राजकारण हे दगडविटांनी बनतं. साहित्य म्हणजे वाहतं पाणी.
ऑटोमन काळात भटके कथाकार असायचे 'मेद्दा' नावाचे. ते कॉफीगृहात जायचे, तिथे बघ्यांच्या समोर किस्सेकहाण्या ऐकवायचे, बर्याचदा त्यात उत्स्फूर्तपणे बदलही करायचे. गोष्टीत एखादं नवीन पात्र आलं की मेद्दा वेगळा आवाज काढून त्या व्यक्तिरेखेला जिवंत करीत. कुणीही जाऊन ते ऐकू शकायचं - सामान्य जनता, अगदी सुलतान, मुस्लीम लोक आणि मुस्लीम नसलेलेही. कथा सगळ्या सीमा ओलांडतात. "मुल्ला नसिरूद्दीनच्या गोष्टीं"सारख्या, त्या तर मध्य-पूर्वेत, उत्तर आफ्रिकेत, बाल्कन प्रदेशात आणि आशियात प्रसिध्द होत्या. आजही कथा सीमांच्या पल्याड जातात. जेव्हा पॅलेस्तिनी आणि इस्रायली नेते बोलतात, तेव्हा ते बर्याच वेळा एकमेकांचे ऐकतच नाहीत. पण एखादा पॅलेस्तिनी वाचक अजूनही एखाद्या ज्यू लेखकाचे पुस्तक वाचतो, त्याच्या भावना जाणून घेऊ शकतो, त्यांचे धागे जुळतात, तीच बाब एखाद्या ज्यूची देखील. साहित्याने आपल्याला [भेदांच्या] पलीकडे न्यायला हवे. जर तसे होत नसेल तर ते चांगले साहित्य नव्हेच.
एकेकाळच्या एका आत्मकेंद्री, आणि भित्र्या मुलीला, मला, पुस्तकांनी वाचवलं आहे. पण मला याची कल्पना आहे की त्यांच्या अती आहारी जाण्यातही धोका असतो. जेव्हा कवी आणि गूढवादी रूमी, त्याच्या आध्यात्मिक गुरुतुल्य मित्राला, शम्स-ए-तब्रीज याला भेटला, तेव्हा त्याने पहिल्यांदा काय केलं असेल तर रूमीची पुस्तकं पाण्यात फेकून दिली आणि अक्षरं विरघळून जाताना पहात राहिला. सूफी म्हणतात, 'जे ज्ञान तुम्हाला तुमच्या 'स्व'च्या पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही ते अज्ञानापेक्षाही भयंकर आहे'. आजकालच्या सांस्कृतिक कोंडवाड्यांमुळे उभा ठाकलेला प्रश्न अज्ञान हा नाही. आपल्याला एकमेकांबद्द्ल खूप काही माहीत असतं, निदान आपल्याला तसं वाटतं तरी. पण जे ज्ञान आपल्याला आपल्यापलीकडे बघायला शिकवत नाही ते आपल्याला तथाकथित उच्चभ्रू, अलिप्त आणि बाकीच्यांपासून तोडत जातं. मला एक रूपक आवडतं: कंपासप्रमाणे जगणं. तुम्हाला माहीती आहे की कंपासचं एक टोक एका जागी स्थिर असतं. त्याचवेळी दुसरं टोक सतत फिरत मोठं वर्तुळ रेखत जातं. माझ्या साहित्याचंही तसंच आहे. त्याचा एक भाग तुर्की मुळांनी घट्ट इस्तंबूलमध्ये धरून ठेवला आहे. पण दुसरा भाग निरनिराळ्या संस्कृतीशी बंध जोडत जगभर प्रवास करतो. त्या अर्थाने मला म्हणावसं वाटतं की माझं साहित्य हे प्रादेशिकही आहे आणि वैश्विकही आहे, इथलंही आहे आणि सगळीकडचंच आहे.
आता तुमच्यापैकी जे कुणी इस्तंबूलला आले असाल त्यांनी टोपकऽपः महाल पाहिला असेल कदाचित, तो ४०० हून अधिक वर्षे ऑटोमन सुलतानांचे निवासस्थान होता. महालात, नाटकशाळांच्या खणालगत, एक जागा आहे, त्या जागेला "जिनींची भेटायची जागा" म्हणतात. ती इमारतींच्या मधली जागा आहे. या कल्पनेने मला भुरळ पाडली. शक्यतो आपण दोन वस्तूंमधल्या मोकळ्या अवकाशावर विश्वास ठेवायला जात नाही. आपल्याला अशा जागा जिनींसारख्या अमानवी शक्तींच्या अंमलाखाली असल्यासारख्या भासतात, तेच जिनी, ज्यांचे सर्वांग अग्नीमय आहे, जे मूर्तिमंत भ्रम आहेत. पण माझा मुद्दा असा आहे की कदाचित ही अशी अनाकलनीय जागाच लेखक आणि कलाकारांना हवीशी असते. लिहिताना ही अनाकलनीयता आणि बदलत जाण्याची शक्यता मला जपावीशी वाटते. मला आवडतं [लिहिताना] पुढच्या १० पानात काय होणार आहे, हे ही माहिती नसलेलं. माझ्या पात्रांनी मलाच चकित केलेलं मला आवडतं. मी एखाद्या मुस्लीम बाईबद्दल लिहीनही एखाद्या कादंबरीत. आणि कदाचित ती हलकीफुलकी, आनंदी कथा असेल. आणि माझ्या पुढच्या पुस्तकात मी कदाचित नॉर्वेमधल्या एखाद्या देखण्या, समलिंगी प्राध्यापकाविषयीही लिहीन. जोपर्यंत लिखाण मनापासून येतं आहे, तोपर्यंत आपण कशाहीबद्दल लिहू शकतो.
ऑड्रे लॉर्ड एकदा म्हणाली होती, ''आपल्याला श्वेतवर्णीय पूर्वसुरींनी असं म्हणायला शिकवलं की 'माझ्या विचारांमुळेच माझे अस्तित्व आहे'". तिनं सुचवलं,''माझ्या तरल जाणिवांमुळेच मी मुक्त आहे.'" मला वाटतं हे विचारांतलं एक अद्भुतसं स्थित्यंतर आहे. आणि तरीही असं का की, सर्जनशील लेखनाच्या शि़क्षणात आपण विद्यार्थ्यांना पहिल्यांदा काय शिकवतो तर तुम्हाला जे माहीत आहे तेच लिहा. का बरं? कदाचित हा मार्गच बरोबर नाही सुरुवात करण्याचा. कल्पनारम्य साहित्य हे आपण कोण आहोत किंवा आपल्याला काय माहीत आहे किंवा आपली ओळख काय आहे याबाबतच लिहावं असं नाही. आपण तरुणांना आणि आपल्यालाही शिकवायला हवं की खुल्या दिलानं जे वाटतं ते लिहा. आपण आपल्या सांस्कृतिक रिंगणातून बाहेर पडलं पाहिजे, आणि बाकीच्या ठिकाणीही डोकावलं पाहिजे.
शेवटी कथा या भटकणार्या फकिरांसारख्या असतात, वर्तुळांमागून वर्तुळं काढत जाणार्या. त्या सार्या माणुसकीला कवेत घेतात, अस्मितांच्या राजकारणांची पर्वा न करता. आणि ही किती चांगली गोष्ट आहे! आणि शेवट मला एका सूफी कविता सांगावीशी वाटते, ''या, सारे एकदातरी मित्र बनुया, जगणं सोपं करूया, प्रेम देऊया, प्रेम घेऊया, मग जग सगळ्यांचेच होऊन जाईल"
You can share this video by copying this HTML to your clipboard and pasting into your blog or web page. This video will play with subtitles.
You either have JavaScript turned off or have an old version of the Adobe Flash Player. To view this rating widget you
need to get the latest Flash player.
If your browser allows only "trusted sites" to execute Javascript, you should add the "googleapis.com" domain to your whitelist to allow our Flash detection to work properly.
Got an idea, question, or debate inspired by this talk? Start a TED Conversation.
कथा ऐकताना कल्पनांना वाव मिळतो, कथाकथन आपल्याला सांस्कृतिक भिंतींपल्याड नेतं, नवनवे अनुभव कवेत घेता येतात, दुसर्यांच्या भावनांशी तादात्म्य पावता येतं. एलिफ शफाक या साध्याशाच कल्पनेचा विस्तार करताना प्रतिप्रादन करत आहेत की साहित्य खुज्या अस्मितांच्या राजकारणावर मात करू शकतं.
Elif Shafak explicitly defies definition -- her writing blends East and West, feminism and tradition, the local and the global, Sufism and rationalism, creating one of today's most unique voices in literature. Full bio »
Translated into Marathi by Sneha Kulkarni
Reviewed by Gayatri Natu
Comments? Please email the translators above.
18:49 Posted: Oct 2009
Views 4,142,077 | Comments 760
17:36 Posted: Aug 2007
Views 305,993 | Comments 67
Just follow the guidelines outlined under our Creative Commons license.
This comment will be attributed to . Not ? Sign Out.