पुराणकथांची भानगड जर खरंच समजावून घ्यायची असेल आणि ’श्रद्धा-प्रमुखा’ला काय करायचं असतं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट ऐकली पाहिजे गणपतीची, त्या गजमुख देवतेची जो लेखकांचा लेखक आहे आणि त्याच्या भावाची, देवतांचा शूर योद्धा, कार्तिकेयाची. एके दिवशी या दोन भावांनी शर्यत लावली, पृथ्वीभोवती तीन वेळा प्रदक्षिणा पूर्ण करण्याची. भगवान कार्तिकेय आपले वाहन - मोरावर बसले आणि त्यांनी अनेक प्रदेशांवरून, पर्वातांवरून व महासागरांवरून उड्डाण केले. त्यांची एक प्रदक्षिणा पूर्ण झाली, दुसरी पूर्ण झाली आणि तिसरीपण पूर्ण झाली. परंतु, त्यांच्या बंधूंनी म्हणजेच गणरायांनी केवळ आपल्या आई-वडिलांभोवती पहिली, दुसरी आणि तिसरी प्रदक्षिणा पूर्ण केली व ते म्हणाले "मी जिंकलो." "ते कसे?" कार्तिकेयाने विचारले. त्यावर गणराय म्हणाले, "तुम्ही 'जगाभोवती' प्रदक्षिणा पूर्ण केल्या; मी 'माझ्या जगाभोवती' प्रदक्षिणा पूर्ण केल्या." कशाला जास्ती महत्त्व आहे ?
जर तुम्हाला 'जग' आणि 'माझं जग' यांच्यातील फरक समजला तर तुम्हाला लोगॉस आणि मिथॉस मधील फरक पण समजेल. 'जग' हे वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध, सार्वत्रिक, सत्यस्थितीला धरून, शास्त्रोक्त असतं. 'माझं जग' हे व्यक्तिनिष्ठ असतं. ते हळवं असतं. ते वैयक्तिक असतं. त्यात जाणिवा, विचार, भावना आणि स्वप्नं असतात. ती आपल्याबरोबर असलेली एक श्रद्धेची यंत्रणा असते. आपण जिच्यात जगत असतो अशी ती एक अशी पुराणकथा असते.
'जग' आपल्याला सांगतं पृथ्वी कशी चालते, सूर्य कसा उगवतो, आपण कसे जन्माला आलो. 'माझं जग' आपल्याला सांगतं सूर्य का उगवतो, आपण जन्माला का आलो. प्रत्येक संस्कृती स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत असते, "आपल्या अस्तित्वाचं कारण काय आहे?" आणि प्रत्येक संस्कृतीची जीवनाबद्दलच्या समजुतीविषयी स्वत:ची एक वेगळी दंतकथा आहे.
संस्कृती म्हणजे निसर्गावरची आपली प्रतिक्रिया असते, आणि आपल्या पूर्वजांचा हा अर्थबोध पिढ्यान्पिढ्यांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचतो तो कथा, चिन्हे आणि रीतिरिवाजांच्या रूपात ज्यांमध्ये कधीच तर्कचिकित्सेला महत्त्व नसतं. म्हणूनच, याचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की जगातील निरनिराळ्या भागातील लोकांची जगाविषयी वेगवेगळी समजूत आहे. भिन्न लोकांचे निरनिराळ्या गोष्टींकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात.
एकीकडे ’तुमचं जग' असतं आणि दुसरीकडे 'माझं जग' असतं, आणि 'माझं जग' कायमच तुमच्या जगापेक्षा श्रेष्ठ असतं. कारण माझ्या जगात तर्कसंगत विचार असतो आणि तुमच्यात अंधश्रद्धा असते, भाबडा भरवसा असतो, तर्कशून्यपणा असतो. हेच मूळ कारण आहे समाजांमध्ये असलेल्या संघर्षाचं. एकदा हे ख्रिस्तपूर्व ३२६ व्या वर्षी घडलं सिंधू नदीच्या किनार्यावर, जी आता पाकिस्तानात आहे. या नदीवरून भारत देशाला अजून एक नाव मिळालं: हिदुस्थान. सिंधू.
अॅलेक्झांडर नावाचा मॅसिडोनिया राज्यातला एक युवक, एका "जिम्नॉसॉफ़िस्ट" ला भेटला म्हणजेच एका "नग्न, ज्ञानी पुरुषाला" ला भेटला. तो कोण होता कोणास ठाऊक. कदाचित, एक जैन ऋषी होता इथल्या बाहुबली सारखा, गोमतेश्वर बाहुबली ज्यांची मूर्ती मैसूरपासून फार लांब नाहीये. किंवा कदाचित, तो एक योगी होता, जो एका खडकावर बसून, आकाशाकडे, सूर्य आणि चंद्राकडे एकटक बघत होता.
अॅलेक्झांडरने विचारले, "तू काय करतोयस?" आणि जिम्नॉसॉफ़िस्टने उत्तर दिले "मी शून्यता अनुभवतोय." मग जिम्नॉसॉफ़िस्टने विचारले, "तू काय करतोयस?" आणि अॅलेक्झांडर म्हणाला "मी जग जिंकतोय." आणि दोघं हसू लागले. प्रत्येकाला वाटत होतं, दुसरा मूर्ख आहे. जिम्नॉसॉफ़िस्टने विचार केला "ह्याला जग का जिंकायचं आहे? निरर्थकपणा आहे." आणि अॅलेक्झांडरला वाटले, "हा इथे असा का बसला आहे, आणि काहीच का करत नाहीये? आयुष्य वाया घालवतोय."
या दोन दृष्टिकोनांमधला फरक समजून घेण्यासाठी आपण हे समजावून घेतलं पाहिजे की अॅलेक्झांडरचं व्यक्तिनिष्ठ सत्य काय होतं: त्याला माहिती असलेली मिथकं आणि त्यामागच्या पुराणकथा काय होत्या. अॅलेक्झांडरच्या आईनं, त्याच्या वडिलांनी , त्याचे गुरू ऍरिस्टॉटलनी त्याला होमरच्या "इलियड" मधली गोष्ट सांगितली होती. त्यांनी अॅलेक्झांडरला सांगितलं की, अकिलीस नावाचा एक असा थोर नायक होता, ज्याचे युद्धात आगमन होताच यश निश्चित होत असे, आणि त्याने युद्धातून माघार घेताच पराभव अटळ असे. "अकिलीस इतिहास घडवणारा होता, नियती घडवणारा होता, आणि तू असा झाला पाहिजेस, अॅलेक्झांडर." त्याने हेच ऐकले होते.
"तू कसा नसला पाहिजेस?" तू सिसिफस बनू नकोस, जो दिवसभर एक धोंडा पर्वतावर ढकलत न्यायचा आणि रात्री तो गडगडत खाली आलेला बघायचा. असं आयुष्य अजिबात जगू नकोस जे निरस आहे, सामान्य आहे, अर्थशून्य आहे. तू नेत्रदीपक हो! -- ग्रीक नायकांसारखा, जेसन सारखा, ज्याने समुद्र ओलांडला आर्गोनोट्सबरोबर आणि सोन्याची लोकर मिळवली. तू नेत्रदीपक हो, थिसयुस सारखा, जो चक्रव्यूहात शिरला आणि ज्याने बैलमुखी मिनॉटॉरला मारले. तू शर्यत लावलीस, तर यशस्वी हो! -- कारण जेव्हा तू जिंकतोस, त्यावेळच्या यशाचा आनंद हा तुला दैवी आनंदाच्या सर्वात निकट नेतो."
याचं कारण असं की, ग्रीक लोकांची अशी श्रद्धा आहे की मनुष्य एकदाच जगतो आणि मृत्यूच्या पश्चात, स्टाईक्स नदी पार करतो. आणि जर तुम्ही अलौकिक आयुष्य जगला असाल, तर स्वर्गात स्वागत होईल, किंवा ज्याला फ्रेंच लोक "शॉंज़े लीसे" असं म्हणतात -- (हशा) -- वीरांच्या स्वर्गात.
पण जिम्नॉसॉफ़िस्टने अशा कथा ऐकल्या नव्हत्या. त्याने खूप वेगळी कथा ऐकली होती. त्याने ऐकली होती गोष्ट भरताची, ज्याच्या नावामुळे इंडियाला भारत हे नाव आहे. भरतानेदेखील जग जिंकलं होतं. आणि मग तो जगाच्या मध्यभागी असलेल्या सर्वात उंच, मेरू पर्वताच्या शिखरावर गेला. त्याला तिथे जाऊन झेंडा गाडायाचा होता आणि म्हणायचं होतं, "मी इथे पहिल्यांदा पोहोचलो" पण जेव्हा तो शिखरावर पोहोचला, तेव्हा त्याला सर्वत्र असंख्य झेंडे दिसले, त्याच्या आधी आलेल्या जगज्जेत्यांचे, प्रत्येक झेंडा ठासून सांगत होता "'मी इथे पहिल्यांदा पोहोचलो' ... ..असं मला इथे येईपर्यंत वाटत होतं." आणि अचानक, या अमर्यादपणाच्या सागरात, भरताला आपण तुच्छ असल्यासारखे वाटले. जिम्नॉसॉफ़िस्टच्या पुराणकथांच्या मागे असे विचार होते.
त्याच्यासाठी नायक होते ते, राम -- रघुपती राम आणि कृष्ण, गोविंद हरी. पण ते दोन वेगळ्या प्रवासातील दोन वेगळी पात्रं नव्हते. ते एकाच नायकाचे दोन अवतार होते. रामायण संपले की महाभारत सुरू होते. रामाचा मृत्यू झाला, की कृष्णजन्म होतो. कृष्णाचा मृत्यू झाला, की तो कधीतरी पुन्हा राम म्हणून परत येईल.
भारतीयांमध्ये पण एक नदी होती, जिवंत आणि मृतांच्या जमिनींना विभागणारी. पण तुम्ही ती एकदाच पार करायची नसते. तुम्ही तिच्यात निरंतर इकडून तिकडे ये-जा करत राहता. त्या नदीचे नाव वैतरणी होते. तुम्ही हा प्रवास पुन्हा पुन्हा करत राहता. याचं कारण असं की भारतात कुठलीच गोष्ट शाश्वत नसते, अगदी मृत्यूसुद्धा. आणि म्हणून असे मोठे सण असतात ज्या मध्ये देवीच्या मोठ्या मूर्ती घडवल्या जातात आणि त्यांची दहा दिवस पूजा केली जाते ... आणि दहा दिवसांनंतर त्यांचं काय केलं जातं? नदीत विसर्जन. कारण या समारंभाचा अंत झाला पाहिजे. आणि पुढच्या वर्षी देवी परत येईलच. ज्याची सुरुवात होते, त्याचा अंत झालाच पाहिजे आणि हा नियम सगळ्यांना लागू असतो, फक्त मनुष्यालाच नव्हे, तर देवतांना सुद्धा. देवतांनी परत यायचं असतं पुन्हा, पुन्हा, राम बनून, कृष्ण बनून. त्यांना फक्त अमर्याद आयुष्यंच नसतात, तर ते प्रत्येक आयुष्य अमर्याद वेळा जगतात जोपर्यंत त्यामधून बोध होत नाही तोपर्यंत. "ग्राउंडहॉग डे." (हशा)
दोन वेगळ्या संस्कृती, वेगळ्या पुराणकथा. कोणती बरोबर आहे? दोन वेगळ्या दंतकथा, जगाकडे बघण्याचे दोन वेगळे दृष्टिकोन. एक सरळ रेषेसारखे आणि एक चक्रीय. एकाची श्रद्धा आहे की हे आयुष्य म्हणजे एकमेव आयुष्य आहे. तर दुसऱ्याची श्रद्धा आहे की हे अनेक आयुष्यांपैकी एक आहे. आणि म्हणूनच अॅलेक्झांडरच्या आयुष्याचा विभाजक एक होता. त्यामुळे, त्याच्या आयुष्याची किंमत त्याच्या पराक्रमांची बेरीज होती. जिम्नॉसॉफ़िस्टच्या आयुष्याचा विभाजक अनंत होता. त्यामुळे त्याने काहीही केलं तरी त्याची किंमत शून्यच होती. आणि मला असं वाटतं की या पुराणकथांतूनच प्रेरणा घेऊन भारतीय गणितज्ञांनी ’शून्य’ या संख्येचा शोध लावला असावा. कोणाला ठाऊक?
आणि आता आपण बघूयात, ही पुराणकथांची भानगड काय आहे. जर अॅलेक्झांडरची वागणूक त्याच्या श्रद्धेशी निगडित असेल, आणि जिम्नॉसॉफ़िस्टची श्रद्धा त्याची वागणूक स्पष्ट करत असेल, तर त्याचा प्रभाव त्यांच्या व्यवसायावर असणं खूपच स्वाभाविक आहे. व्यापार म्हणजे तरी काय, बाजार कसा वागतो आणि एक व्यावसायिक संघटना कशी वागते हेच ना? जर तुम्हाला जगातील संस्कृती समजावून घ्यायच्या असतील, तर केवळ त्यांच्या पुराणकथांमागचे विचार समजावून घ्या. मग तुमच्या लक्षात येईल, त्या कशा वागतात आणि कशा चालतात.
बारकाईनं बघा. तुम्ही जर एकदाच जगणार असाल, एकेरी-आयुष्य संस्कृतीतल्यासारखे, तर तिथे तुम्हाला या गोष्टींचा ध्यास दिसेल: दुहेरी तर्कशास्त्र, संपूर्ण सत्य, प्रमाणीकरण, विशुद्धपणा, एका रेषेत आखलेल्या योजना. पण चक्रीय विचारसरणीच्या संस्कृतीत, जी अगणित आयुष्यांवर आधारित आहेत, तिथे तुम्हाला या गोष्टी सवयीच्या दिसतील: अंदाजाचे तर्कशास्त्र, वैयक्तिक मते, संदर्भाला धरून विचार, आणि ’सगळंच परिस्थितीवर अवलंबून असतं’ हा विचार, साधारणपणे -- (हशा) बहुधा. (हशा)
आता कलेबद्दलच घ्या. एखाद्या बॅलेरीनाला निरखा. तिचं नृत्य कसं सरळ रेषेसारखं असतं. आणि हेच हिंदुस्तानी शास्त्रीय नर्तिकेकडे बघा, कुचीपुडी किंवा भरतनाट्यम नर्तिकेकडे रेखीव. (हशा)
आणि मग व्यापाराकडे बघा. सामान्य व्यापारशास्त्राची सूत्रं: दूरदृष्टीने नियोजन, उद्दिष्ट, मूल्ये आणि प्रक्रिया. हे ऐकायला त्या प्रवासासारखे वाटते, रानावनातून देवाने कबूल केलेल्या जमिनीकडे चाललेला प्रवास, जिथे नेत्याच्या हातात ईश्वरी आज्ञा असतात, आणि जर या आज्ञांचे पालन कराल तर स्वर्गात नक्की जाल.
पण भारतात स्वर्गाची अशी एक व्याख्या नाही आहे. अनेक आहेत. समाजातील हुद्द्यानुसार, जीवनातील टप्प्यानुसार. इथले व्यवसाय एखाद्या संस्थेसारखे कुण्या एकाच्या लहरी विचारांवर चालवले जात नाहीत. सगळं कायम आवडीप्रमाणे असतं. माझ्या आवडीप्रमाणे.
उदाहरणार्थ हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात ’हार्मनी’ (शिस्तबद्ध एकत्र वादन) ही संकल्पना नाही आहे. वाद्यवृंदाचा मार्गदर्शक असा कोणीच नसतो. तिथे एक मुख्य कलाकार असतो आणि त्याला अनुसरून इतर लोक वाजवतात. एक प्रयोग त्याच प्रकारे पुन्हा कधीच सादर होत नाही. त्यात कुठलीच कागदपत्रे किंवा करार नसतो. सगळं संवादावर आणि विश्वासावर चालतं. त्यात कशाचं पालन नसतं. त्यात असतो माहोल. काम फत्ते करण्याला महत्त्व असतं, येन केन प्रकारेण -- तुमच्या आजूबाजूला बसलेल्या भारतीयांकडे पहा, ते हसताना दिसतील; त्यांना माहीत आहे मी कशाबद्दल बोलत आहे. (हशा) आणि मग त्या लोकांकडे बघा ज्यांनी भारतात धंदा केला आहे, तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर हताश संताप दिसेल. (हशा) (टाळ्या)
आज भारत देश असा आहे. सत्य हे चक्रीय दृष्टिकोनावर आधारलेलं आहे. त्यामुळे ते वेगाने बदलणारं, विविधतापूर्ण, गोंधळलेलं, अनेकार्थी, अंदाज लावता न येणारं असं आहे. आणि लोकांना हे चालतं. आता जागतिकीकरण होतंय. संस्थांवर आधारलेल्या आधुनिक विचारसरणीची गरज भासू लागलीय, जिची मुळं एकेरी-आयुष्य संस्कृतीत दडलेली आहेत. आणि संघर्ष होणार आहे, जसा सिंधू नदीच्या किनारी झाला होता. हे होणारच आहे.
मी हे स्वतः अनुभवलं आहे. मी एक मेडिकल डॉक्टर आहे. मला शस्त्रक्रिया करायला शिकायचं नव्हतं. का ते विचारू नका. मला पौराणिक कथांचा अभ्यास करायला जरा जास्तच आवडतो. मला पौराणिक कथांच्या मागचा विचार शिकायचा होता. पण त्याचा अभ्यास कुठेच शिकवला जात नाही. त्यामुळे मलाच स्वतःला शिकवायला लागलं. आणि पौराणिक कथांचा अभ्यास करून पोट भरत नाही, अं..आजवर भरत नव्हतं. (हशा) त्यामुळे मला नोकरी करावी लागली. आणि मी औषधनिर्मिती क्षेत्रात नोकरी केली. मी आरोग्यसेवा-क्षेत्रात पण काम केलं. आणि विक्रेता म्हणून, जाणकार म्हणून, माहितगार आणि शिक्षक म्हणून काम केले. मी एक व्यावसायिक सल्लागार म्हणून पण काम केले. त्यात मी व्यावसायिक नीती आणि उपाय सुचवत असे. आणि मला हतबल संताप दिसत असे. माझ्या अमेरिकन आणि युरोपियन मित्रांच्या चेहऱ्यावरती, जे भारताबरोबर व्यवसाय करत होते.
उदाहरणार्थ: कृपया मला रुग्णालयांना यादी कशा प्रकारे द्यावी हे सांगा. कृती अ ,कृती ब, कृती क. बहुतेकदा. (हशा) या "बहुतेकदा" चा अर्थ काय असतो? त्याला एका छानशा सॉफ्टवेअर मध्ये कसे घालतात? ते शक्य नाहीये.
मी माझं मत लोकांना सांगायचो. पण कोणाला त्यात रस नव्हता. शेवटी मी ’फ्यूचर ग्रुप’च्या किशोर बियाणी यांना भेटलो. त्यांनी बिग बझार नावाची सर्वात मोठी किराणामाल दुकानांची साखळी स्थापन केली आहे. आणि या दुकानांचे २०० हून जास्ती प्रकार आहेत जे भारतातल्या ५० शहरांमध्ये पसरले आहेत. ते वैविध्यपूर्ण आणि गतिमान बाजारात काम करत होते. त्यांना आतून हे कळत होतं की ज्या व्यापारातील युक्त्या जपान, चायना, युरोप आणि अमेरिकेत चालल्या त्या भारतात चालल्या नसत्या. त्यांना हे समजलं होतं की भारतात संस्थात्मक विचारसरणी न चालता , वैयक्तिक विचारसरणी चालते. त्यांना आतूनच भारतातील पौराणिक रचनेची समज होती.
त्यामुळे त्यांनी मला प्रमुख श्रद्धा अधिकारी बनायला सांगितलं, आणि म्हणाले, "मला तू लोकांची श्रद्धा एकमुख करायला हवी आहेस" ऐकायला किती सोपं वाटतं. पण श्रद्धा मापता येत नाही. ती मोजता येत नाही. तिचं व्यवस्थापन करता येत नाही. मग श्रद्धा निर्माण कशी करतात ? लोकांची भारतीयपणाबद्दल संवेदनशीलता, कशी वाढवता येईल. जरी तुम्ही भारतीय असाल तरी ते इतकं उघड नाही आहे, स्पष्ट नाही आहे.
म्हणून मी एक आदर्श सांस्कृतिक साचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच कथा, चिन्हं आणि विधी बनवले. आणि मी त्यातल्या एका विधीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. हा, ’दर्शन’ या हिंदू विधीवर आधारित आहे. हिंदूंमध्ये ईश्वरी आज्ञांची संकल्पना नाही. त्यामुळे, आपण आयुष्यात जे काही करतो त्यात बरोबर किंवा चूक असं काही नसतं. त्यामुळे तुम्हाला खात्री नसते की तुम्ही देवासमोर कसे उभे राहता आहात. जेव्हा तुम्ही देवळात जाता तेव्हा तुम्हाला, देव एक श्रोता म्हणून हवा असतो. तुम्हाला देवाला बघायचं असतं. आणि देवानी तुम्हाला बघावं असं वाटत असतं आणि म्हणूनच देवाला मोठे डोळे असतात, मोठे टक लावून बघणारे डोळे, कधी चांदीचे, जे तुमच्याकडे बघतात. कारण तुम्हाला माहीत नसतं की तुम्ही बरोबर आहात की चूक, आणि त्यामुळे तुम्हांला हवी असते फक्त देवाची सहवेदना. त्यानं तुम्हांला समजून घेतलंय ही जाणीव. "समजून घे मी कुठून आलो आहे, मी जुगाड का केले." (हशा) "का मी सेटिंग लावले, का मी प्रक्रिया पाळली नाही, कृपा करून, मला फक्त समजून घे."
आणि यावर आधारित एक विधी आम्ही प्रमुख अधिकाऱ्यांसाठी निर्माण केला. या अधिकाऱ्याचे प्रशिक्षण होऊन तो एका दुकानाचा कारभार हाती घ्यायला तयार झाला की, आम्ही त्याचे डोळे झाकायचो, त्याच्याभोवती ग्राहक, त्याचे कुटुंबीय, त्याचे सहकारी, त्याचे वरिष्ठ जमत. त्याचा के. आर. ए. , के. पी. आय. (त्याच्या जबाबदार्या, त्याच्या कामाचं मूल्यांकन) सर्वांसमोर वाचून, त्याला किल्ल्या दिल्या जात आणि मग त्याचे डोळे उघडले जायचे. आणि न चुकता तुम्हाला त्याच्या डोळ्यात अश्रू दिसत असे, कारण त्याला आतून एक जाणीव होत असे. त्याच्या लक्षात येत असे की, यशस्वी होण्यासाठी त्याला औपचारिक होण्याची गरज नव्हती, त्याला त्याच्या भावना सीमित ठेवायची गरज नव्हती. त्याच्या जगातील या सगळ्यांना, त्याने बरोबर घेतलं पाहिजे, ज्यामुळे ते समाधानी राहतील, त्याचे वरिष्ठ खूष राहतील, सगळेच समाधानी राहतील. ग्राहक खूष राहील कारण, ग्राहक हा देव असतो.
आपल्याला संवेदनशीलतेची गरज असते. एकदा ही भावना मनात भिनली, की वागणूक बदलते, व्यवसाय आपोआप होतो. आणि असं घडलंय. आणि आता आपण परत अॅलेक्झांडर कडे येऊ, आणि जिम्नॉसॉफ़िस्टकडे. सगळे मला विचारतात, "हे बरोबर का ते?" आणि हा खूप भयंकर प्रश्न आहे. कारण यामुळे काही मूलभूत वादांना आणि हिंसेला वाचा फुटू शकते. त्यामुळे मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही. मी तुम्हाला देणार आहे एक भारतीय उत्तर. भारतीयांची खासियत, मान डोलावणे. (हशा) (टाळ्या)
संदर्भ लक्षात घेऊन, परिणाम लक्षात घेऊन, तुमचा मार्ग निवडा. कारण दोन्ही मार्ग शेवटी मनुष्यानेच बनवले आहेत. त्या सांस्कृतिक निर्मिती आहेत, नैसर्गिक रचना नाहीत. आणि म्हणूनच यापुढे जेव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटाल, तेव्हा एक विनंती आहे: हे समजून घ्या की तुम्ही व्यक्तिनिष्ठ सत्यात जगता, आणि ती पण. समजून घ्या. हे जाणून घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल, काहीतरी अद्वितीय. तुमच्या लक्षात येईल की अगणित पुराणकथांमध्ये दडलेलं आहे, ते परमसत्य. हे सगळं कुणाला दिसतं? वरुणाला सहस्त्र नेत्र आहेत. इंद्राला शंभर. तुम्हाला आणि मला फक्त दोन. धन्यवाद. (हशा)
You can share this video by copying this HTML to your clipboard and pasting into your blog or web page. This video will play with subtitles.
You either have JavaScript turned off or have an old version of the Adobe Flash Player. To view this rating widget you
need to get the latest Flash player.
If your browser allows only "trusted sites" to execute Javascript, you should add the "googleapis.com" domain to your whitelist to allow our Flash detection to work properly.
Got an idea, question, or debate inspired by this talk? Start a TED Conversation.
देवदत्त पट्टनाईक आपल्याला घेऊन जात आहेत भारतीय आणि पाश्चात्त्य पुराणकथांच्या जगात. ते आपल्याला सांगतात की या दोन पुराणकथांमधील देव, मृत्यू आणि स्वर्ग या कल्पनांमध्ये मूलभूत फरक आहेत, जे या दोन प्रांतांतील लोकांमध्ये अनेकदा गैरसमज निर्माण करण्यास कसे कारणीभूत असतात.
Devdutt Pattanaik looks at business and modern life through the lens of mythology. Full bio »
Translated into Marathi by Chaitanya Shivade
Reviewed by Gayatri Natu
Comments? Please email the translators above.
19:12 Posted: Jun 2008
Views 442,482 | Comments 164
Just follow the guidelines outlined under our Creative Commons license.
This comment will be attributed to . Not ? Sign Out.