स्थापत्यशास्त्राविषयीच्या सामान्य माणसांच्या चर्चा बरेचदा त्यातून उभ्या राहणाऱ्या रचनेपुरत्या मर्यादित राहतात उदा. लंडनमधला नवीन टॉवर तोंडल्यासारखा दिसतो की सॉसेजसारखा किंवा तो सेक्सी आहे का?
म्हणून अलीकडे आम्हाला वाटले की आपण असे एखादे माध्यम शोधावे ज्याद्वारे स्थापत्यप्रकल्पांच्या कथा लोकांपर्यंत पोहचवता येतील. कदाचित चित्रे किंवा प्रतिमा आणि शब्दांद्वारे स्थापत्यकलेच्या गोष्टी सांगता येतील. आणि मग आमच्या लक्षात आले की हे माध्यम नव्याने शोधण्याची गरज नाही चित्र-पुस्तकाच्या (कॉमिक्सच्या) रुपाने ते आधीच अस्तित्वात आहे!
मग आम्ही कॉमिक्सच्या संकल्पनेचा वापर करायचे ठरवले. या चित्र-पुस्तिकेतून आम्ही पडद्यामागच्या कथा सांगतो म्हणजे विविध बदलांतून आणि उस्फूर्त कल्पनांतून प्रकल्प कसा आकार घेत गेला. थोडक्यात वैचारिक घुसळण, मिळालेल्या संधी आणि वास्तव दुनियेत घडणाऱ्या घटनांचा मेळ घालत. आम्ही या पुस्तकाचे नाव ठेवले येस इज मोअर (होकार म्हणजेच अधिक) एकप्रकारे हे शीर्षक आमच्या वास्तूशिल्पी पूर्वसुरींच्या कल्पकतेचे पुढचे पाउल आहे!
याचंच उदाहरण, मीस व्हन दा गोहर चे “कमी म्हणजे जास्ती” हे विधान. त्याने स्थापत्यशास्त्राच्या आधुनिक क्रांतीला चालना दिली. यानंतर आधुनिक क्रांतीपश्चात एक प्रतिक्रांती झाली! जेव्हा वास्तुविशारद रॉबर्ट व्हेंचुरी म्हणाला “कमी म्हणजे कंटाळवाणे” त्याच्यानंतर अमेरिकी वास्तुविशारद फिलिप जॉन्सनने किंवा (हशा) त्याच्या स्वैराचारी कृत्यांनी म्हणा हवं तर, नवीन कल्पनांसाठी दार उघडून दिले. आणि सध्याच्या जागतिक मंदीतदेखील श्री. ओबामा आपल्या विधानाने सकारात्मकतेशी ओळख घडवत आहेत.
आणि आम्हीदेखील “येस इज मोअर” या पुस्तकातून या धारणेला आव्हान देऊ इच्छितो की स्थापत्यशास्त्रातील क्रांतीची व्याख्या बरेचदा नकारात्मक आणि कशाच्यातरी विरुद्ध असते क्रांतिकारक वास्तुशिल्पी हा जणू प्रस्थापितांविरुद्ध बंडखोरी करणारा संतापी तरुण किंवा एक उपेक्षित प्रज्ञावंत, जो जगाच्या रूढ चाकोरीमुळे त्रासला आहे. आम्हाला क्रांतीपेक्षा उत्क्रांतीमध्ये अधिक रस आहे. या संकल्पनेत की गोष्टी हळूहळू, बदलत्या काळानुसार स्वतःला बदलत आणि उत्क्रांत होत जातात.
खरं तर मला वाटते, आमच्या आराखडा बनवण्याच्या प्रक्रियेला स्पष्ट करण्यासाठी डार्विन इतका योग्य दुसरा माणूस नाही! त्याची प्रसिद्ध उत्क्रांती-वृक्षाची प्रतिमा म्हणजे जणू आमची काम करण्याची पद्धत. तुम्ही पहाताय की कोणताही प्रकल्प हा आराखड्यासाठी होणाऱ्या अनेक बैठकांमधून विकसित होत जातो. प्रत्येक बैठकीमध्ये असंख्य कल्पना पुढे येतात. आणि शेवटी त्यातल्या सर्वोत्तम कल्पना टिकून राहतात. आणि या निवड प्रक्रियेतून कधी एक देखणी संरचना निवडली जाते, तर कधी सर्वात कार्यक्षम. या दोन्ही संरचनांचा मिलाफ घडून नवीन संरचना तयार होते. आणि बैठकींच्या वेळी होणाऱ्या अशा अनेक मिलाफांतून आमचा अंतिम आराखडा तयार होतो.
या आमच्या कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचा कोपेनहेगनमधला ग्रंथालय आणि हॉटेलचा प्रकल्प. याचा आराखडा बनवणं अत्यंत आव्हानात्मक होतं अगदी जीवन मरणाच्या संघर्षाइतकं. पण हळूहळू कल्पना विकसित होत गेली. यामागे शहराशी एकरूप होणारा एक सुसंगत टॉवर असा काहीसा विचार होता. अशी एक सार्वजनिक जागा जी रोममधल्या प्रसिद्ध स्पॅनिश स्टेप्स ची स्कॅन्डेनेव्हीयन आवृत्ती असेल. पण जी आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी सार्वजनिक असेल, आणि जिथे ग्रंथालय असेल.
पण डार्विनचा उत्क्रांतीवाद केवळ एकाच कल्पनेच्या विकासापुरता मर्यादित नाही. कधी कधी एका उपकल्पनेचा जन्म होतो. बरेचदा एखाद्या आराखड्यावर काम करताना जाणवतं की ही फारच सुंदर कल्पना आहे. पण या प्रकल्पात बसत नाहीये. पण दुसऱ्या संस्कृतीतल्या एखाद्या ग्राहकासाठी ही कल्पना एका वेगळ्या संदर्भात योग्य ठरू शकेल. त्यामुळे होतं असं की आम्ही कोणतीच कल्पना बाद करत नाही. आमचं कार्यालय हे जणू स्थापत्यकलेच्या विविध नमुन्यांचे प्रदर्शन असल्यासारखं दिसतं! कोणती गोष्ट कधी उपयोगी पडेल काय सांगावे!
आणि आता मी तुम्हाला जलदगतीने काही गोष्टी सांगणार आहे. ही गोष्ट आहे आमच्याच दोन प्रकल्पांची त्यांच्या जडणघडणीची आणि जगात योगायोगाने घडणाऱ्या घटनांची. पहिली गोष्ट सुरु होते गेल्या वर्षी जेव्हा आम्ही शांघायमध्ये २०१० साली होणाऱ्या विश्व प्रदर्शनासाठी डॅनिश प्रदर्शनकक्षाच्या संरचनेसाठीच्या स्पर्धेत भाग घेतला. तिथे आम्ही हायबाओला पाहिले. तो होता त्या विश्व प्रदर्शनाचा प्रतिकदूत (Mascot). आणि तो आमच्या एकदम परिचयाचा वाटला. (कारण) त्याचा आकार आम्ही रचना केलेल्या उत्तर स्वीडनमधील एका हॉटेलसारखा होता! आम्ही त्या स्वीडिश स्पर्धेसाठी पाठवलेला आराखडा आमच्या मते चांगलाच होता! पण तो उत्तर स्वीडनमधल्या गोष्टीसारखा दिसत नव्हता. स्विडीश परीक्षकांनादेखील तो फार पसंत पडला नाही आणि आम्ही हरलो.
मात्र त्यानंतर आमची एका चीनी उद्योजकाशी भेट झाली. आमचे डिझाईन पाहून तो उद्गारला, ” अरेच्चा हे तरं चीनी लिपीतलं "जनता" या अर्थाचं चिन्ह.” (हशा) अस्सं म्हणजे चीनी लिपीमध्ये द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना लिहिताना हे चिन्ह वापरतात तर! आम्ही पुन्हा एकदा खात्री करून घेतली! त्याच वेळी आम्हाला शांघाय औद्योगिक कल्पकता सप्ताहासाठी निमंत्रण मिळाले. मग आम्ही ठरवले ही सुवर्णसंधी वाया घालवायची नाही! आम्ही एका फेंगशुई तज्ज्ञाची मदत घेतली. त्या आराखड्यात तिप्पट वाढ करून तो चीनी शास्त्रानुसार प्रमाणित केला आणि चीनला जाऊन धडकलो! (हशा) आता ही इमारत “लोकांची वास्तू” झाली होती. इथे तुम्हाला दोन चीनी दुभाषी आमची संकल्पना समजवताना दिसत आहेत.
आमचे हे डिझाईन वेन वेई पो वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाले! ते पाहून आम्हाला शांघायचे महापौर श्री.लियान्ग यु चेन यांनी भेट दिली. तेव्हा आम्हाला त्यांना ही संकल्पना सांगण्याची संधी मिळाली. ते म्हणाले “ शांघायमध्ये जगातील सर्वाधिक गगनचुंबी इमारती आहेत." पण त्यांच्यामते मातीशी नाते तुटत चालले होते. त्यांना आमच्या या “लोकांच्या वास्तू” मध्ये ती नाळ पुन्हा जोडली जाण्याची शक्यता दिसली,जी प्राचीन चीनचे ज्ञान आणि प्रगतीशील चीनच्या भविष्यामधला दुवा ठरेल. अर्थातच आम्ही या गोष्टीशी पूर्णपणे सहमत होतो!! (हशा) (टाळ्या) दुर्दैवाने श्री.चेन सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत ही गोष्ट सोडा! (हशा)
पण मी आधी म्हणाल्याप्रमाणे हायबाओ (लोकांच्या) परिचयाचा होता. कारण चीनी भाषेत त्याचा अर्थच होतो सामान्य जनता. आणि त्याला प्रदर्शनाचा दूत म्हणून निवडला होता कारण प्रदर्शनाचं बोधवाक्य होतं “उत्तम शहरे, उत्तम जीवन” अर्थात शाश्वत विकास. आम्हाला असं वाटतं होतं की शाश्वत विकास म्हणजे अशी पुरोगामी कल्पना बनली आहे ज्यातून स्वतःला त्रास झाल्याशिवाय चांगलं निष्पन्न होत नाही.
म्हणजे पहा, शॉवरखाली खूप वेळ आंघोळ करू नये. सुट्टीवर असताना विमानप्रवास टाळावा कारण ते वातावरणास हानिकारक असतं. हळूहळू तुम्हाला वाटू लागते की शाश्वत विकासाचे आयुष्य हे नेहमीच्या आयुष्यापेक्षा निरस असते. म्हणूनच आम्हाला वाटलं की अशा उदाहरणांकडे लक्ष वेधावे ज्यात शाश्वत विकासामुळे शहरी जीवनाचे राहणीमान अधिक चांगले होते.
आम्ही असाही विचार केला की डेन्मार्ककडे चीनला दाखवण्यासारखे काय आहे? चीन जगातील बलाढ्य देशांपैकी एक तर डेन्मार्क एक छोटासा देश. ड्रॅगन ही चीनची खुण तर डेन्मार्कचा राष्ट्रीय पक्षी हंस! (हशा) चीनमध्ये अनेक महान कवी झाले.
पण मग आमच्या लक्षात आलं की चीनच्या शालेय अभ्यासक्रमात आन् तु शुंगच्या तीन परीकथा आहेत! ज्याला आम्ही हॅन्स क्रिस्चियन ऍन्डरसन म्हणतो. म्हणजेच १३ कोटी चीनी हे या तीन गोष्टी ऐकत लहानाचे मोठे झाले आहेत, द एम्परर्स न्यु क्लोद्स, द मॅचस्टिक गर्ल आणि द लिटिल मर्मेड. जणू डॅनिश संस्कृतीचा एक तुकडा चीनी संस्कृतीच्या वीणीमध्ये घट्ट गुंफला गेला आहे!
चीनमधले सर्वाधिक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे चीनची भिंत. पृथ्वीवरील एकमेव गोष्ट जी चंद्रावरून दिसते. डेन्मार्कमधले सर्वाधिक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे द लिटिल मर्मेड (छोटी जलपरी) जी खरं सांगायचं तर नदीच्या सहलबोटीतूनदेखील नीट दिसेलच याची खात्री नाही! (हशा)
यातून जाणवतं की ही दोन्ही शहरं किती भिन्न आहेत. कोपनहेगन, शांघाय आधुनिक, युरोपियन. पण जेव्हा आम्ही चालू शहरी विकासाकडे पाहिलं तेव्हा लक्षात आलं की शांघायचे रस्ते असे दिसायचे. ३० वर्षांपूर्वी, फक्त सायकली एकही कार नाही. आणि आता असे दिसतात. सगळा ट्राफिक जॅम. बऱ्याच ठिकाणी सायकलींवर बंदी आहे.
त्याचवेळी कोपनहेगनमध्ये आम्ही सायकलींचे रस्ते वाढवत आहोत. एक तृतीयांश लोकं सायकलने हिंडतात. आमच्याकडे सिटी बाईक नावाची नि:शुल्क सायकल व्यवस्था आहे. जी तुम्ही शहराला भेट द्याल तेव्हा वापरू शकता. मग आम्ही विचार केला की आपण चीनला सायकल संस्कृतीची पुन्हा ओळख का करून देऊ नये? आपण शांघाय शहराला हजार सायकली भेट देऊ. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रदर्शाला भेट द्याल तेव्हा प्रथम डॅनिश कक्षाला भेट द्या. एक डॅनिश सायकल घ्या आणि मग बाकीचे प्रदर्शन पाहात हिंडा!
मी म्हणालो त्याप्रमाणे शांघाय आणि कोपनहेगन दोन्ही बंदरे आहेत. पण कोपनहेगन बंदरातले पाणी इतके स्वच्छ आहे की लोकं त्यात पोहू शकतात. आमचा एक सुरुवातीचा प्रकल्प हा कोपनहेगनमधला हार्बर बाथ (बंदरामधिल स्नान) होता. याला पाण्यातील सार्वजनिक जागेसारखं काहीतरी म्हणता येईल. आम्ही विचार केला की बहुतांश वेळा या प्रदर्शनांमधून सरकारी धोरणे, चित्रे वैगरे दाखवली जातात मात्र खराखुरा अनुभव मिळत नाही. आपण केवळ बोलून न दाखवता सायकलसारखं करुया. तुम्ही करून पाहू शकता. पाण्याच्याबाबतीत देखील नुसतं बोलण्याऐवजी आम्ही कोपनहेगन बंदरातलं लाखो लिटर पाणी शांघायला नेणार आहोत. जे धाडसी चीनी लोकं असतील त्यांनी प्रत्यक्ष पाण्यात उडी मारून अनुभवावं की ते किती स्वच्छ आहे!
आता याला बरेच लोकं आक्षेप घेतील की हे पर्यावरणाच्या विरुद्ध आहे. कोपनहेगनहून शांघायला पाणी नेणं. पण प्रत्यक्षात मालवाहू बोटी चीनमधून माल भरून डेन्मार्कला येतात आणि रिकाम्या परत जातात तेव्हा बरेचदा वजन संतुलनासाठी त्या पाणी भरून नेतात. तेव्हा आम्ही जवळजवळ फुकटात पाणी नेऊ शकू!
आणि या बंदरातल्या पाण्याच्या मध्यभागी आम्ही खरीखुरी लिटिल मर्मेड (छोटी जलपरी) बसवणार आहोत. म्हणजे खरी जलपरी, खरे पाणी आणि खऱ्या सायकली! आणि ती गेल्यावर त्या जागी चीनी कलाकाराकडून त्याच्या नजरेतून साकारलेली जलपरीची प्रतिकृती बनवून घेणार आहोत या कक्षाची संरचना ही प्रदर्शन आणि सायकल याचा मेळ असेल. जेव्हा तुम्ही प्रदर्शन पाहायला जाल तेव्हा तिथे तुम्हाला जलपरी आणि पाण्याचा तलाव दिसेल. थोडं चाललात की तुम्हाला सायकली दिसतील त्यातली एक उचलून तुम्ही सायकलवरून बाकीचं प्रदर्शन पाहू शकाल.
जेव्हा आम्ही ती स्पर्धा जिंकलो तेव्हा आम्हाला हा प्रकल्प समजावून देण्यासाठी चीनमध्ये एक छोटं प्रदर्शन करावं लागलं. नवल म्हणजे आमच्या एका फलकावर चीनी प्रशासनाने बदल सुचवले! पहिली गोष्ट आमच्या चीनच्या नकाशात तैवान दाखवला नव्हता. हा चीनमध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय आहे. आम्ही नकाशा बदलू. दुसरी गोष्ट, आम्ही हंसाची तुलना ड्रॅगनशी केली होती, चीनी प्रशासनाने त्या जागी पांडा घालावा असे सुचवले! (हशा) (टाळ्या)
जेव्हा डेन्मार्कमध्ये ही बातमी झाली की आम्ही डेन्मार्कचे राष्ट्रीय शिल्प हलवणार तेव्हा नॅशनल पीपल्स पार्टीने यावर तीव्र विरोध दर्शवला. त्यांनी जलपरीचे शिल्प हलवण्याविरुद्ध एक कायदा पास करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी प्रथमच मला संसदेमध्ये भाषणासाठी आमंत्रित केले गेले. हे जरा मजेशीर होते! म्हणजे सकाळी नऊ ते अकरा संसदेत डॅनिश अर्थव्यवस्था सावरण्यासाठी करोडोंचे अर्थसहाय्य देण्याविषयी चर्चा चालू होती आणि मग अकरा वाजता ही बिनमहत्वाची चर्चा बाजूला ठेवून अकरा ते एक छोटी जलपरी चीनला पाठवावी की नाही यावर चर्चा झाली! (हशा) (टाळ्या)
शेवटी सांगायची गोष्ट अशी की जर तुम्ही पुढच्या वर्षी मे ते डिसेंबरदरम्यान छोटी जलपरी पाहायला येणार असाल तर कोपनहेगनला येऊ नका. कारण तेव्हा ती शांघाय मध्ये असणार आहे. आणि जर तुम्ही कोपनहेगनला आलात तर तुम्हाला अई वईवई या चीनी कलाकाराचे शिल्प दिसेल. पण जर का चीनी प्रशासनाने हस्तक्षेप केला तर ते पांडाचे शिल्प असू शकेल! (हशा)
आता मी जी दुसरी गोष्ट सांगणार आहे ती माझ्याच घरात सुरु झाली! हे माझं घर आहे. आणि हे माझ्या घरातून दिसणारे दृश्य. एका त्रिकोणाकृती बाल्कनीतून दिसणारे जिला आमचा एका ग्राहकमित्र लिओनार्डो दि काप्रिओ बाल्कनी म्हणतो. या बाल्कन्या मिळून जणू एक उभं अंगण तयार करतात. जिथे एखाद्या सुंदर दिवशी तुम्ही १० मीटर त्रिज्येतल्या तुमच्या शेजाऱ्यांशी ओळख करून घेऊ शकता. हे घर म्हणजे एक वेडावाकडा चौकोन आहे. वाकडातिकडा अशासाठी की सर्व अपार्टमेंटस् ना चांगला नजारा मिळावा, एकमेकांच्या भिंती दिसण्यापेक्षा.
अलीकडेपर्यंत माझ्या घरातून हे दृश्य दिसत होते. तोवर जेव्हा माझ्या मित्राने ही शेजारची जागा विकत घेतली. आणि त्याने तिथे एक इमारत व वाहनतळ उभारण्याचे जाहीर केले. आम्ही विचार केला की साचेबंद इमारत बांधण्यापेक्षा जिथून केवळ पार्किंगची जागा दिसेल आपण प्रत्येक घराचे पेंटहाऊस करू आणि खाली पार्किंग करू.
आणि कोपनहेगन हे सपाट जमिनीवर वसलेलं असल्याने दक्षिण बाजूस उतार असलेलं विहंगम दृश्य मिळवण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात. मग आम्ही थोडी उंची कमी केली म्हणजे माझ्या घरातून दिसणाऱ्या नजारा अबाधित राहील! (हशा) आणि पार्किंग हे मुख्यतः घरांच्या खालच्या जागेत मावेल.
आणि वरती सूर्यप्रकाशात एका पातळीत सर्व आधुनिक सुखसोयींनीयुक्त जसे की एक बाग असलेली आणि दाट शहरी वस्तीतली घरे असतील. हे आमचे पहिले संरचनेचे प्रारुप आहे. हा गेल्या उन्हाळ्यात आकाशातून घेतलेला फोटो. घरे पार्किंगच्या जागेला आच्छादित करतात. घरांपर्यंत पोचायला तिरक्या लिफ्टचा वापर केला जातो. ही लिफ्ट स्वित्झर्लंडमध्ये तयार होते. कारण अर्थातच स्वित्झर्लंडमध्ये निसर्गत:च लोकांना तिरक्या लिफ्टची गरज पडते! (हशा)
आणि ही पार्किंगची दर्शनी भिंत. आम्हाला पार्किंग नैसर्गिकरित्या हवेशीर हवे होते. त्यामुळे आम्हाला ते जाळीदार करणे भाग होते. आणि आमच्या लक्षात आलं की जाळीच्या भोकांचा आकार कमी जास्ती केला तर आम्ही त्या अख्ख्या दर्शनी भिंतीचे रुपांतर एका भव्य नैसर्गिकरित्या हवेशीर उठावदार भित्तीचित्रात करू शकतो. आम्ही या प्रकल्पाला द माऊंटन असं म्हणत होतो म्हणून, आम्ही एका हिमालयाचे फोटो काढणाऱ्या जपानी फोटोग्राफरकडे एका सुंदर माऊंट एव्हरेस्टच्या फोटोची मागणी केली आणि एका बिल्डिंगचे रुपांतर ३००० स्क्वे.मीटरच्या भव्य कलाकृतीमध्ये केले! (टाळ्या)
त्यामुळे जर तुम्ही पार्किंगमधून हिंडत कॉरिडोरमध्ये शिरलात तर तुम्हाला गाड्या आणि रंगाच्या एका समांतर दुनियेतून जणू एखाद्या दक्षिणमुखी शहरी ओऍसिसमध्ये शिरल्याचा भास होईल. तुमच्या घराची लाकडी भिंतच बिल्डिंगबाहेरील भिंत होईल. आणि त्यापुढे तिचे रुपांतर एका सुंदर बगिच्यात होईल. या माऊंटनवर पडणारे पावसाचे सर्व पाणी साठवले जाते. एका स्वयंचलित सिंचन पद्धतीने जिने बागेला पाणी मिळते हा सर्व परिसर एक दोन वर्षात एखाद्या प्राचीन कंबोडियन मंदिराप्रमाणे संपूर्ण हिरवळीने झाकलेला दिसू लागेल.
तर अशाप्रकारे माऊंटन हे आम्ही साकारलेलं पहिलं उदाहरण आहे ज्याला आम्ही स्थापत्यशास्त्रातील परीसस्पर्शी किमया असं संबोधू इच्छितो. अशी कल्पना ज्यातून तुम्ही सोनं नाही बनवू शकणार पण(ती) पारंपारिक इमारती, पार्किंग इत्यादींना एक नवीन मूल्य प्राप्त करून देईल. आणि या उदाहरणात तर लोकांना निर्सग सान्निध्यातील जीवन किंवा शहरी जीवन यापैकी एकच निवडण्याची गरज नाही. त्यांना दोन्ही मिळू शकतं.
एक वास्तुविशारद म्हणून काम करताना विशिष्ठ धोरण ठरवणं अवघड असतं. तुम्ही असं म्हणू शकत नाही की आता मी मध्य आशियामध्ये एक शहर शाश्वत पद्धतीने विकसित करेन. कारण तुम्हाला कामाची कंत्राटे अशी मिळत नाहीत. तुम्हाला सतत परिस्थितीशी जुळवून घेत संधी आणि अपघातांतून घडत जात जगाच्या पसाऱ्यात वावरावं लागतं.
आता एक शेवटचं उदाहरण आहे आम्ही नुकतंच गेल्या उन्हाळ्यात जी स्पर्धा जिंकली त्याचं. ती होती नॉर्डिक राष्ट्रीय बँकेच्या आराखड्यासाठी हे त्या बँकेचे संचालक होते अर्थात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू असे. (हशा) ही राजधानीच्या अगदी मध्यभागी असल्याने या संधीमुळे आम्ही खुपच उत्साही होतो. दुर्दैवाने ही होती आइसलँड ची राष्ट्रीय बँक.
त्याचं वेळी अझरबैजान देशाच्या एका मंत्र्यांनी आमच्या कार्यालयाला भेट दिली. आम्ही त्यांना आमचा माऊंटन प्रकल्प दाखवायला घेऊन गेलो. आणि त्यांना एखाद्या इमारतीमध्ये खराखुरा पर्वत उभारण्याच्या कल्पनेने भारून टाकले. याचे कारण म्हणजे अझरबैजान हा देश मध्य आशियातील आल्प्स म्हणून ओळखला जातो. मग त्यांनी आम्हाला विचारले की आम्ही खरोखर एक पूर्ण शहराचा आराखडा बनवू शकू का जे राजधानी जवळच्या एका बेटावर उभारता येईल (आणि) ज्यात अझरबैजानच्या सात प्रसिद्ध पर्वतांच्या प्रतिकृती बनवता येतील.
आणि आम्ही ते कंत्राट घेतले. अन् आम्ही एक लघुपट बनवला जो मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो. आम्ही बरेचदा असे लघुपट बनवतो. आणि त्यातील पार्श्वसंगीताबद्दल आमच्यात बरेचदा वाद होतात. पण यावेळी पार्श्वसंगीत ठरवणं अगदी सोपं होतं. तर बाकू हे चंद्रकोरीच्या आकाराची खाडी असणारे आम्ही बांधत असलेल्या झिरा बेटाजवळचे (शहर) आहे. जवळपास त्यांच्या राष्ट्रध्वजाच्या आकाराचे. अन् आमची मूळ कल्पना अझरबैजानमधले सात महत्वाचे पर्वत निवडावेत आणि त्यांच्या आकाराचा पुनर्विचार करून शहरी वास्तू उभाराव्यात ज्या मानवी वसतीयोग्य असतील अशी होती. आणि या पर्वताच्या आकाराच्या वास्तू त्या बेटाच्या मध्यभागी असलेल्या हिरव्या दरीच्या कडेने असाव्यात. अगदी एखाद्या मध्यभागी असलेल्या उद्यानाप्रमाणे.
आणि यातला गमतीचा भाग असा की याक्षणी हे बेट केवळ एक वाळवंट आहे. तिथे तसूभरही हिरवळ नाही. ना पाणी ना उर्जा ना काही संसाधन स्त्रोत. त्यामुळे आम्ही या संपूर्ण बेटावर एकच जैवपरिसंस्था बनवणार आहोत. वायूउर्जेचा वापर करून पाण्याचे नि:क्षारीकरण करणार आहोत आणि पाण्याच्या औष्णिक तत्वांचा वापर करून इमारतींचे वातानुकुलन करणार आहोत. आणि सर्व प्रकारचे जादा गोडे पाणी हे नैसर्गिकरीत्या गाळून बागकामासाठी वापरले जाईल. अन् हळूहळू या वाळवंटी बेटाचे एका हिरव्यागार परिसरात रुपांतर होईल.
म्हणजे तुम्ही म्हणू शकता की शहरी विकास जो सामन्यत: निसर्गासाठी हानीकारक ठरतो या ठिकाणी मात्र निसर्गाच्या वाढीस कारणीभूत ठरला आहे. आणि या इमारती केवळ पर्वताच्या आकाराच्या नाहीत तर त्या पर्वतासारखे काम देखील करतात. त्या वाऱ्यापासून बचाव करतात. त्या सौरउर्जा साठवून ठेवतात. त्या पाणी साठवतात. त्यामुळे त्या या संपूर्ण बेटाचे रूपांतर एका जैवपरिसंस्थेमध्ये करतात.
आम्ही आत्ताच मुख्य आराखडा सादर केला. आणि तो मान्य देखील झाला. आणि या उन्हाळ्यात आम्ही पहिल्या दोन पर्वतांच्या आराखड्यांची कागदपत्रे बनवायला सुरुवात करू. हे मध्य आशियामधील पहिले कार्बन-संतुलित बेट असणार आहे. (टाळ्या) होय. आता थोडी सगळ्याची गोळाबेरीज. तर आता तुम्हाला दिसेल की कशी कोपनहेगनच्या माऊंटनची कल्पना अझरबैजानच्या सात शिखरांमध्ये उत्क्रांत होत गेली. थोडसं नशीब आणि त्याहून थोडी अधिक उत्क्रांती या दोन्हीमुळे कदाचित दहा वर्षांत मंगळावर पाच पर्वत देखील अशक्य नसेल! धन्यवाद! (टाळ्या)
You can share this video by copying this HTML to your clipboard and pasting into your blog or web page. This video will play with subtitles.
You either have JavaScript turned off or have an old version of the Adobe Flash Player. To view this rating widget you
need to get the latest Flash player.
If your browser allows only "trusted sites" to execute Javascript, you should add the "googleapis.com" domain to your whitelist to allow our Flash detection to work properly.
Got an idea, question, or debate inspired by this talk? Start a TED Conversation.
डॅनिश वास्तुशिल्पी ब्याके इन्येल्स आपल्याला दृकश्राव्य कथांच्या सफारीतून सांगत आहे त्याच्या लखलखत्या पर्यावरणीय संरचनांबद्दल. त्याच्या इमारती केवळ नैसर्गिक दिसत नाहीत तर त्या निसर्गाची कार्येदेखील करतात: वारा अडवतात, सौरउर्जा साठवतात आणि खिळवून ठेवतात.
Theory meets pragmatism meets optimism in Bjarke Ingels' architecture. His big-think approach is informed by a hands-on, ground-up understanding of the needs of a building's occupants and surroundings. Full bio »
Translated into Marathi by Jidnyasa Mulekar
Reviewed by Shruti Ponkshe
Comments? Please email the translators above.
19:24 Posted: Oct 2008
Views 266,475 | Comments 52
18:36 Posted: Jul 2009
Views 432,440 | Comments 406
22:00 Posted: Jan 2008
Views 319,455 | Comments 40
Just follow the guidelines outlined under our Creative Commons license.
This comment will be attributed to . Not ? Sign Out.