मी तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहे, त्याचा उल्लेख माझ्या पुस्तकात आहे. मी अशी आशा करतो की हे ऐकून तुम्ही इतर गोष्टींशी याचा संबंध लावाल आणि तसं झालं नाही तर मी स्वतः ते तुम्हाला दाखवून द्यायचा प्रयत्न करेन. मी सुरुवात करणार आहे ती "अधिकृत तत्त्वप्रणाली" पासून पण, कशाची अधिकृत तत्त्वप्रणाली? सगळ्या पाश्चात्य औद्योगिक समाजांची अधिकृत तत्त्वप्रणाली. आणि ही अधिकृत तत्त्वप्रणाली अशी आहे: जर आपल्याला नागरिकांचे जास्तीत जास्त कल्याण करण्यात रस असेल, तर वैयक्तिक स्वातंत्र्य वाढवले पाहिजे. कारण स्वातंत्र्य हे तत्त्वत: माणसासाठी चांगले, महत्वाचे, अत्यावश्यक आणि मौल्यवान आहे. आणि जर प्रत्येकाला स्वातंत्र्य असेल, तर प्रत्येक व्यक्ती असे कार्य करत राहील, ज्यामुळे तिचे सर्वाधिक कल्याण होईल, आणि आपले निर्णय कधीच इतर कोणाला घ्यावे लागणार नाहीत. स्वातंत्र्य वाढवायचं असेल तर निवडीचे पर्याय वाढवले पाहिजेत.
लोकांकडे जितके जास्त पर्याय असतील, तितकं जास्त स्वातंत्र्य असेल, आणि जितकं जास्त स्वातंत्र्य, तितकं जास्त कल्याण.
हे विचार आपल्याकडच्या पाण्यातच असे बेमालूम मिसळले गेलेत की त्यांच्यावर आक्षेप घ्यावा असा विचारही कोणाला शिवणार नाही. आणि या विचारांनी आपल्या आयुष्यात देखील खोलवर स्थान निर्माण केले आहे. आधुनिक विकासानं आपल्यासाठी काय शक्य केले आहे याची उदाहरणं मी तुम्हाला देतो. हे माझं सुपरमार्केट आहे. फार मोठं नाही आहे. मला सॅलड ड्रेसिंग विषयी काही बोलायचं आहे. माझ्या सुपरमार्केट मध्ये १७५ प्रकारचे सॅलड ड्रेसिंग आहेत, जर तुम्ही १० वेगळे एक्स्ट्रा-व्हर्जिन ऑलिव ऑईल आणि १२ वेगळे बल्सामिक व्हिनेगर वापरून बनवता येऊ शकणारे सॅलड मोजले नाहीत तर, ते ही अशा दुर्मिळ प्रसंगी, जेव्हा त्या १७५ पैकी कुठलेच ड्रेसिंग तुम्हाला आवडत नाही तेव्हा. तर, सुपरमार्केट हे असं असतं. आणि मग तुम्ही एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात जाता,एक स्टिरीओ सिस्टिम बनवून घ्यायला. स्पीकर्स, सीडी प्लेयर, टेप प्लेयर, ट्यूनर, ऍम्प्लीफायर. आणि या एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात, अनेक स्टिरीओ सिस्टिम असतात. या एका दुकानात विक्रीसाठी असलेल्या गोष्टी वापरून आपण पासष्ठ लाख वेगळ्या स्टिरीओ सिस्टिम घडवू शकतो.
पर्याय अनेक असतात, हे तुम्ही मान्य केलच पाहिजे. इतर कार्यक्षेत्रात -- दळणवळणाच्या जगतात. एक काळ असा होता, माझ्या लहानपणी, दूरध्वनीची सेवा पण उपलब्ध नसे, जी नंतर "मा बेल" तर्फे सुरु करण्यात आली. फोन भाडयाने घ्यावा लागत असे. तो विकत घेतला जात नसे. त्याचा एक परिणाम असा होता की, फोन तुटत नसे. आणि आता ते दिवस गेले. आता अगणित प्रकारचे फोन उपलब्ध आहेत, खास करून सेलफोन - मोबाइल्स. हे भविष्यातले सेल फोन आहेत. माझा सर्वात आवडता, त्या मनाने साधा -- एमपीथ्री प्लेयर, नोज ट्रीमर आणि क्रेम बृली टॉर्च. आणि जर तुम्ही असा फोन बाजारात बघितला नसेल, तर काळजी करू नका, एके दिवशी लवकरच नक्की बघाल. आणि यामुळे होते काय, लोक दुकानात जाऊन असा फोन मिळेल का, हे विचारतात. आणि आत्ता या प्रश्नाचे उत्तर काय आहे, ठाऊक आहे? उत्तर आहे "नाही". सध्या असा फोन मिळत नाही ज्यात इतक्या गोष्टी करू शकण्याची क्षमता आहे .
आता, आयुष्याच्या काही अशा गोष्टी, ज्या वस्तू विकत घेण्यापेक्षा जास्ती महत्वाच्या आहेत, पर्यायांचा उद्रेक हा तिथे सुद्धा आहे. हेल्थ केअर.आता अमेरिकेत तो काळ मुळीच राहिला नाही की तुम्ही डॉक्टरकडे जाता, आणि तो तुम्हाला काय केलं पाहिजे ते सांगतो. या उलट, तुम्ही डॉक्टरकडे जाता, आणि डॉक्टर तुम्हाला सांगतो, आपण 'अ' करू शकतो किंवा आपण 'ब' करू शकतो. 'अ' चे हे फायदे आहेत, आणि हे धोके आहेत. 'ब' चे हे फायदे आहेत, आणि हे धोके आहेत. तुम्हाला काय करायचे आहे? आणि तुम्ही म्हणता "डॉक्टर, मी काय करू?" त्यावर डॉक्टर म्हणतो, 'अ' चे हे फायदे आहेत, हे धोके आहेत, 'ब' हे फायदे आहेत,हे धोके आहेत. तुम्हाला काय करायचे आहे? मग तुम्ही म्हणता, "जर तुम्ही माझ्या जागी असता, तर तुम्ही काय केले असते?" आणि डॉक्टर म्हणतो, "पण मी म्हणजे तुम्ही नव्हे" आणि याचा परिणाम म्हणजेच -- ज्याला आम्ही "पेशंट ऑटोनॉमी " (रुग्णाची स्वायत्तता) म्हणतो, ज्यामुळे ते ऐकायला पण एक चांगली गोष्ट असल्याचा भास होतो. पण वास्तविकत:, हे निर्णय घेण्याच्या जबाबदारीचे ओझे दुसरीकडे ढकलणेच आहे, एका अशा व्यक्तीकडून, ज्याला काहीतरी समज आहे -- म्हणजेच डॉक्टर -- ते अशा व्यक्तीकडे ज्याला काहीच कळत नाही आणि जिला खात्री आहे की ती आजारी आहे आणि निर्णय घेण्यास समर्थ नाही आहे -- म्हणजेच रुग्ण.
केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच मिळू शकणार्या औषधांसाठीदेखील विक्रीशास्त्राचा प्रचंड वापर केला जातो, तुमच्या-माझ्यासारख्यांवरती. आणि याचा विचार केल्यास असं लक्षात येतं की त्याचा काहीच उपयोग नाही, कारण आपण प्रिस्क्रिप्शनशिवाय ती औषधं खरेदी करू शकत नाही. आपण जर ती औषधं स्वत: विकत घेऊ शकत नाही तर आपल्याला विकायचा ते प्रयत्न का करतात? याचं उत्तर असं आहे, की त्यांची अशी अपेक्षा असते की उद्या आपण डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन बदलायला सांगावं. आपल्या व्यक्तित्वासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आता पसंतीची, निवडीची बाब बनली आहे, असंच हे चित्र दर्शवत आहे. व्यक्तित्व हे जन्मजात मिळत नाही, ते शोधायचं, कमवायचं असतं. आणि ते आपण हवं तितक्या वेळा शोधू शकतो, बदलू शकतो. आणि याचाच अर्थ असा की रोज सकाळी उठल्यावर, तुम्ही ठरवायचं असतं, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे. लग्न आणि संसाराचा विचार केला, तर एके काळी सगळ्यांचाच असा समज होता की प्रत्यकाने लवकरात लवकर लग्न करावं आणि लवकरात लवकर मुलांना जन्म द्यावा. निर्णय घ्यावा लागायचा तो फक्त एकच - कुणाशी लग्न करायचं हा; कधी करायचं हा नाही, त्यनंतर काय हासुद्धा नाही.
आजकाल सगळंच मिळवण्यासाठी चढाओढ आहे. मी अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना शिकवतो, आणि पूर्वीपेक्षा २० टक्के कमी काम देतो. आणि याचं कारण ती मुलं कमी हुशार आहेत, किंवा कमी कष्टाळू आहेत असं मुळीच नाही. याचं कारण म्हणजे त्यांची व्यापलेली मने, सतत विचार करणे, "मी लग्न करू का नको? आत्ता लग्न करू का नंतर करू? आधी मुलं का आधी करिअर?" हे सगळे व्यापून टाकणारे , डोकंखाऊ प्रश्न आहेत. आणि त्यांना या प्रश्नांना सामोरं जावं लागणारच आहे, मी दिलेलं काम केलं तरी किंवा नाही केलं तरी आणि माझ्या विषयात खराब गुण मिळवले तरी. आणि त्यांनी हा विचार केलाच पाहिजे. या प्रश्नांची उत्तरं महत्त्वाची आहेत. काम -- आपण नशीबवान आहोत, जसं कार्ल ने सांगितलं, की तंत्रज्ञान वापरून आपण प्रत्येक दिवसातल्या प्रत्येक क्षणाला काम करू शकतो, तेही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून रॅनडॉल्फ हॉटेल सोडून.
असा एक कोपरा आहे ,बरका, ज्याबद्दल मी कुणालाच सांगणार नाही आहे, जिथे वाय-फाय चालतं. मी तुम्हाला त्या बद्दल सांगणार नाही कारण मला तो वापरायचा आहे. कामाबद्दलच्या या प्रचंड निवड-स्वातंत्र्याचा अर्थ असा, की आपल्याला एक निर्णय घ्यायचा असतो, पुन्हा पुन्हा, आणि पुन्हा - आपल्याला आत्ता काम करायला हवंय की नाही. आपण मुलांना सॉकर (फुटबॉल) खेळताना बघायला जाऊ शकतो, सेल फोन कमरेच्या एका बाजूला लावून, ब्लॅकबेरी दुसऱ्या बाजूला लावून आणि लॅपटॉप मांडीवर ठेवून. आणि या सर्व गोष्टी बंद असल्या तरी तो प्रत्येक क्षण जेव्हा आपण मुलाला सॉकर खेळताना बघतो, आपण स्वतःला विचारतही असतो, "हा कॉल घेऊ का? या ई-मेल ला उत्तर देऊ का? या पत्राचा ड्राफ्ट लिहू का?" आणि जरी या प्रश्नाचं उत्तर "नाही" असलं, तरी त्यामुळे नक्कीच आपल्या मुलाचा सॉकर खेळ बघायचा तुमचा अनुभव (ही साधनं घेऊन न जाण्याच्या वेळेपेक्षा) खूपच वेगळा असणार आहे. त्यामुळे आपण कुठेही बघितलं, लहान-मोठ्या गोष्टींकडे, भौतिक गोष्टींकडे किंवा राहाणीसाहाणीच्या गोष्टींकडे, तर दिसतं की आयुष्य ही निवडीची बाब आहे. आपण ज्या काळात मोठे झालो तो असा होता. म्हणजे काही पर्याय होते, पण प्रत्येक बाबतीत पर्याय नव्हते. आणि आत्ताचा काळ हा असा आहे. आणि प्रश्न असा आहे की ही चांगली गोष्ट आहे का वाईट? आणि उत्तर आहे हो.
यात चांगलं काय आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे, म्हणून मी आज ह्यात वाईट काय आहे याबद्दल बोलणार आहे. या पर्यायांचे दोन परिणाम आहेत, लोकांवर होणारे दोन वाईट परिणाम. पहिला, विरोधाभास म्हणजे यामुळे दुर्बलता वाढते, उद्धार होत नाही, मोकळीक मिळत नाही. निवडीसाठी इतके पर्याय असल्यामुळे, लोकांना निवड करणं खूप अवघड जातं. मी तुम्हाला याचं एक नाट्यमय उदाहरण देतो. ऐच्छिक निवृत्ती (व्ही.आर. एस.) मधल्या गुंतवणुकीचा एक अभ्यास केला गेला. माझ्या एका सहकारी व्यक्तीला काही गुंतवणुकीच्या नोंदी मिळाल्या, व्हॅनगार्डच्या जी एक अजस्त्र म्युच्युअल फंड कंपनी आहे ज्यात दहा लाखांच्या आसपास कर्मचारी आहेत आणि २००० स्वतंत्र शाखा आहेत. आणि तिला असे दिसून आले की देऊ केलेल्या प्रत्येक १० म्युच्युअल फंड मागे, सहभागाचे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी होत गेले. तुम्ही जर ५० म्युच्युअल फंड देऊ केले तर १० टक्के कमी कामगार सहभागी होतील, तुम्ही पाच म्युच्युअल फंड दिले असते तेव्हाच्या संख्येहून. असं का ? कारण ५० म्युच्युअल फंड निवडीसाठी असले की कशात सहभागी व्हायचं हे ठरवणं खूप कठीण जातं, आणि तुम्ही हा निर्णय उद्यावर ढकलता. आणि उद्या, आणि मग उद्या, आणि उद्या आणि उद्या, आणि साहजिकच उद्याचा दिवस कधीच उगवत नाही. हे समजावून घ्या की यामुळे लोकांवर निवृत्तीनंतर दात कोरत बसायची वेळ येणारच आहे पुरेसे पैसे बाजूला न ठेवल्याने; एवढंच नाही तर, हा निर्णय घेणं इतकं कठीण असतं की लोक तेवढ्याच किमतीची गुंतवणूक मालकाकडून मिळवायची संधीही सोडून देतात. हा सहभाग न घेतल्यामुळे प्रत्येक वर्षी ते ५००० डॉलर एकढी रक्कम गमावून बसतात जी त्यांच्या मालकाने स्वतःचा भाग म्हणून आनंदाने भरली असती. म्हणजेच दुबळेपणा हा खूप जास्त पर्यायांचा परिणाम आहे. आणि मला वाटतं की यामुळे जग हे असं दिसतं.
तुम्हांला आपला निर्णय योग्य असलाच पाहिजे असं वाटेल, जर त्याचा परिणाम अनंतकाळ राहणार असेल तर, नाही का? तुम्हाला चुकीचा म्युच्युअल फंड निवडायचा नाहीये किंवा चुकीचे सॅलड ड्रेसिंग सुद्धा. हा एक परिणाम झाला. दुसरा परिणाम असा आहे की जर या दुबळेपणावर मात करून आपण निर्णय घेतला तरी, आपण तेवढे संतुष्ट नसतो जेवढे आपण इतके पर्याय नसताना असलो असतो. आणि याची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे, निवडीसाठी असलेल्या अनेक सॅलड ड्रेसिंगपैकी जर आपण एक विकत घेतले, आणि ते सर्वोत्कृष्ट नसेल -- आणि, तुम्हाला माहिती आहे, सॅलड ड्रेसिंग म्हणजे काय? कल्पना करायला सोपं आहे की तुमची निवड वेगळी असू शकली असती. अजून चांगली होऊ शकली असती. आणि यामुळे होतं काय या काल्पनिक पर्यायामुळे तुम्ही केलेल्या निवडीबद्दल खेद व्यक्त करू लागता, आणि ही भावना तुम्ही घेतलेल्या निर्णयातून मिळणाऱ्या समाधानाला वजा करू लागते, जरी तो एक चांगला निर्णय असला तरी सुद्धा. जितके पर्याय जास्त, तितका खेद जास्त - तुम्ही निवडलेल्या पर्यायात ज्या काही असमाधानकारक गोष्टी तुम्हांला दिसतात त्याबद्दल.
दुसरं म्हणजे ज्याला अर्थतज्ञ "ऑपॉरच्युनिटी कॉस्ट" (संधीची किंमत) म्हणतात. डॅन गिलबर्टने आज सकाळी हाच मुद्दा मांडला जेव्हा ते म्हणाले की आपण गोष्टींना दिलेली किंमत ही आपण त्या गोष्टींची तुलना कशाबरोबर करतो यावर अवलंबून असते. जेव्हा खूप जास्ती पर्याय असतात तेव्हा आपण नाकारलेल्या पर्यायाच्या आकर्षक वैशिष्ट्यांची कल्पना करणं सोपं असतं, जे तुम्हाला तुमच्या निवडीबद्दल अजून असंतुष्ट बनवतं. हेच उदाहरण बघा. जे न्यूयॉर्कवासी नाही आहेत त्यांची मी क्षमा मागतो.
पण तुम्ही असा विचार करायला पाहिजे असतो. हे जोडपं ’हॅम्प्टन्स’ या न्यूयॉर्कबाहेरच्या आलीशान ठिकाणी आलंय. प्रचंड महाग रियल इस्टेट. भव्य समुद्र किनारा. सुंदर दिवस. त्यांच्याकडे हे सगळं काही आहे. याहून जास्त भारी काय असू शकतं ? "च्यामारी" हा माणूस विचार करतोय, "ऑगस्ट महिना आहे. मॅनहॅटन मधले सगळे बाहेर गेले आहेत. मी माझ्या तिथल्या बिल्डिंगच्या बरोबर समोर पार्किंग करू शकलो असतो." आणि तो सुट्टीचे दोन आठवडे या गोष्टीचा विचार करत घालवतो की आपण ती संधी गमावतोय, दिवसेंदिवस, पार्किंगसाठी चांगली जागा मिळवायची. ऑपॉरच्युनिटी कॉस्ट घेतलेल्या निर्णयातून मिळणाऱ्या समाधानाला वजा करू लागते, तो सर्वोत्कृष्ट निर्णय असला तरीही. आणि जितके जास्ती पर्याय, तितक्या जास्ती पर्यायांची आकर्षक वैशिष्ट्ये. ज्याचं ऑपॉरच्युनिटी कॉस्ट मध्ये रुपांतर होतं. अजून एक उदाहरण घ्या. हे कार्टून अनेक गोष्टींबद्दल भाष्य करतंय. आत्ताचा क्षण पुरेपूर उपभोगण्याबद्दल, आणि कदाचित निवांत काम करण्याबद्दल. पण एक मुद्दा ज्यावर हे भाष्य करतं ती म्हणजे जेव्हा तुम्ही एक गोष्ट निवडता तेव्हा तुम्ही इतर गोष्टी नाकारता. आणि त्या इतर गोष्टींची अनेक आकर्षक वैशिष्ट्यं असतात, आणि त्यामुळे तुम्ही जे करताय ते कमी आकर्षक होतं.
तिसरा: अपेक्षांची वाढ. मी नवी जीन्स पॅन्ट घ्यायला गेलो तेव्हा मला याची जाणीव झाली. मी नेहमी जीन्स घालतो. आणि एक काळ असा होता की जीन्सचा एकच प्रकार असायचा, आणि तुम्ही ती विकत घ्यायचा, आणि तिचं फिटिंग भयंकर असायचं, आणि ती घातल्यावर प्रचंड अस्वस्थ वाटायचं. अनेकदा घातल्यानंतर आणि अनेकदा धुतल्यावर कुठे ती घालून बरी वाटत असे. तर मी जीन्स बदली करून घ्यायला गेलो, वर्षानुवर्ष घातलेली ती जुनी जीन्स, आणि म्हणालो "मला नवीन जीन्स हवी आहे, हे माझं माप." आणि दुकानदार म्हणाला, "तुम्हाला स्लीम-फिट हवी आहे, इझी-फिट हवी आहे का रिलॅक्स-फिट ? बटण का चेन? स्टोन वॉश का अॅसिड वॉश ? तुम्हाला ती डिस्ट्रेस करून हवी आहे का ? तुम्हाला बूट कट हवी आहे, का टेपर्ड, ब्लाह ब्लाह ब्लाह ..." त्याचं चालूच होतं. मी अवाक् झालो आणि भानावर आल्यावर म्हणालो, "मला अशी जीन्स हवी आहे जी एकाच प्रकारात पूर्वी मिळायची."
त्याला कळालंच नाही ती काय असते, आणि मी त्याला समजावण्यात एक तास घालवला, आणि त्या दुकानातून बाहेर पडलो -- खरं सांगतो -- मला आजवर सर्वात चांगली बसलेली जीन्स घेऊन. मी अजून चांगलं केलं. हे सगळे पर्याय बघून मी अजून चांगलं करू शकलो. पण मला अधिक वाईट वाटलं. का? मी एक अखंड पुस्तक लिहिलं आणि स्वतःला हे समजावण्याचा प्रयत्न केला. मला वाईट वाटायचं कारण म्हणजे, हे सगळे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे, कुठली जीन्स हवी आहे, याबद्दल वाढलेल्या माझ्या अपेक्षा. माझ्या खूप थोड्या अपेक्षा असायच्या. माझ्या काही खास अपेक्षाच नसायच्या जेव्हा जीन्स त्या एकाच प्रकारात मिळत असे. जेव्हा त्या १०० प्रकारात मिळू लागल्या, तेव्हा च्यामारी, एक तरी परिपूर्ण असली पाहिजे. आणि मला जे मिळालं ते चांगलं होतं पण परिपूर्ण नव्हतं. आणि म्हणून मी काय मिळालं याची तुलना माझ्या अपेक्षांशी करू लागलो, आणि मिळालेलं अपेक्षांच्या तुलनेत निराशाजनक होतं. पर्याय वाढवले की लोकांच्या ते पर्याय किती चांगले असू शकतील याबद्दलच्या अपेक्षा वाढणारच आणि त्यामुळे मिळणारे समाधान हे कमी होणारच, मिळालेलं चांगलं असून सुद्धा. विक्रीशास्त्राच्या जगात हे कुणालाच माहीत नाही आहे. कारण जर त्यांना माहिती असतं, तर तुम्हाला सगळ्यांना हे कळालं नसतं. सत्य हे जरा असं आहे.
पूर्वी सगळं वाईट असून सुद्धा सगळं चांगलं असल्याचं कारण म्हणजे, जेव्हा सगळं वाईट होतं, तेव्हा लोकांना निखळ आश्चर्य अनुभवता येत असे. आजकालच्या जगात -- आपल्यासारखे श्रीमंत, औद्योगिक व्यावसायिक नागरिक, ज्यांची ’परिपूर्णता’ हीच अपेक्षा असते, हे एखादी गोष्ट किती चांगली असावी याची आशा करताना त्यांच्या अपेक्षांएवढाच विचार करू शकतात. निखळ आश्चर्य तुम्हाला कधीच अनुभवता येणार नाही, कारण तुमच्या अपेक्षा, माझ्या अपेक्षा या गगनाला भिडलेल्या आहेत. सुखाचे रहस्य -- ज्यासाठी तुम्ही सगळे आला आहात -- सुखाचे रहस्य म्हणजे कमी अपेक्षा.
मला काहीतरी सांगायचं आहे स्वानुभवावरून, मी माझ्या पत्नीशी लग्न केलं, आणि ती खरच एक चांगली व्यक्ती आहे. या पेक्षा काही चांगलं मी करूच शकलो नसतो. मी नुस्ताच आहे त्याचा स्वीकार केला नाही. पण आहे त्याचा स्वीकार हीदेखील काही वाईट गोष्ट नाहीये. शेवटी, एक वाईट बसणारी जीन्स घेण्याचा एक परिणाम असा आहे: तो जर जीन्सचा मिळणारा एकमेव प्रकार असेल, ज्याने तुम्ही समाधानी नसाल आणि तुम्ही विचारलं का, याची जबाबदारी कोणाची, तर उत्तर उघड आहे. आपल्या भोवतालचे जग यासाठी जबाबदार आहे. तुम्ही काय करू शकला असता? जेव्हा जीन्स चे शंभर प्रकार उपलब्ध असतात आणि तुम्ही एक विकत घेऊन निराश होता, आणि विचारता, ह्याला कोण जबाबदार? तेव्हा उत्तर तेवढच स्पष्ट असतं, तुम्ही. तुम्ही अजून चांगली पसंती करू शकला असता. शंभर जीन्सचे प्रकार दाखवले असल्यामुळे, अपयशाची गय केली जात नाही. आणि म्हणूनच जेव्हा लोक निर्णय घेतात, तेव्हा त्यांचा परिणाम चांगला असला तरी, त्यांना त्याबद्दल निराशा वाटते, ते दोष स्वतःला देतात.
औद्योगिक जगतात वैद्यकीय औदासिन्याची गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. माझं असं मत आहे की याचं मोठं कारण -- एकमेव नव्हे, पण या औदासिन्यामागचं मोठं कारण, आणि या आत्महत्यांमागचं म्हणजे, लोकांना त्यांनी स्वत:च वाढवलेल्या राहणीमानामुळे येणारे निराशाजनक अनुभव. आणि जेव्हा ते स्वतःला हे अनुभव समजावून सांगतात, तेव्हा ते स्वतःला दोष देतात. परिणाम म्हणजे वास्तविक पहाता, आपण चांगला निर्णय घेऊन सुद्धा त्या बद्दल अजून वाईट वाट्णे. म्हणून मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. हे अधिकृत मत आहे, ज्याच्याशी आपण सगळे सहमत असतो, आणि हे साफ खोटं आहे.अजिबात खरं नाहीये. यात काहीच वाद नाही की एक पर्याय दुसऱ्यापेक्षा चांगला असतो, पण याचा अर्थ असा होत नाही की अनेक पर्याय एखाद्या पर्यायापेक्षा चांगले असतात. एक मंतरलेली संख्या आहे. मला नाही माहीत ती काय आहे. मला खात्री आहे की तो काळ आता लांब गेला आहे जेव्हा अनेक पर्यायांचा अर्थ अधिक सुख असे
आता, नियमाप्रमाणे -- मी थांबलं पाहिजे-- पण नियमाप्रमाणे एका गोष्टीचा विचार झाला पाहिजे. या औद्योगिक समाजात पर्यायांचं सामर्थ्य वाढायचं कारण म्हणजे भौतिक संपत्ती. जगात अशा अनेक जागा आहेत, अनेकांबद्दल आपण ऐकतो, जिथे अनेक पर्याय नसणे ही अडचण नसून खूप थोडे पर्याय ही आहे. त्यांची समस्या म्हणजे खूप थोड्या गोष्टी उपलब्ध असणे. त्यामुळे मी जे बोलतो आहे, ही आधुनिक, संपन्न, पाश्चात्य समजातील विशिष्ट समस्या आहे. आणि याबद्दल एवढा राग का येतो, तिडीक का बसते: स्टीव लेव्हीटने काल तुम्हाला सांगितले की बसवायला अवघड आणि तरी महागड्या असलेल्या, मुलांसाठीच्या खुर्च्या कशा निरुपयोगी असतात. हे पैसे वाया घालवणं आहे. मी तुम्हाला काय सांगतोय, की हे महागडे, गुंतागुंतीचे पर्याय -- यांचा उपयोग नसतो एवढंच नाही. तर ते अपायकारक असतात. त्यांचा खरोखर त्रास होतो.
ज्या गोष्टींमुळे आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध होतात, त्यांपैकी काही गोष्टी जर अशा लोकांपर्यंत पोहोचल्या ज्यांच्याकडे खूप थोडे पर्याय आहेत तर फक्त त्याचंच आयुष्य सुखकर होईल असं नाही, आपलं पण होईल. ह्यालाच अर्थतज्ञ "पॅरिटो - इम्प्रूव्हिंग मूव्ह" म्हणतात. मिळकतीची पुन्हा वाटणी केली तर सगळेच आनंदी होतील -- फक्त गरीबच नाही -- कारण या अतिरिक्त पर्यायांमुळे आपल्याला त्रास होतो. तर ह्यातला निष्कर्ष. तुम्ही हे कार्टून बघायचं, आणि एक सभ्य व्यक्ती बनून म्हणायचं, "छे ! या माशाला काय कळतंय? एका फिशबोल मध्ये काहीच शक्य नाही हे तर उघडच आहे." मर्यादित कल्पनाशक्ती, जगाबद्दलचा संकुचित दृष्टीकोन -- आणि मी ही पहिल्यांदा असाच विचार केला होता. नंतर मी याबद्दल जितका जास्ती विचार केला, तितकं मला वाटू लागलं की या माशाला काहीतरी कळतंय. कारण सत्य हेच आहे की जर तुम्ही सगळं करता यावं म्हणून फिशबोल फोडला, तर तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही. तुम्ही दुबळे बनता. जर तुम्ही सगळं करता यावं म्हणून फिशबोल फोडला, तर तुम्ही समाधान कमी करता. तुम्ही दुबळेपणा वाढवता आणि समाधान कमी करता. प्रत्येकाला एका फिशबोलची गरज असते. हा नक्कीच खूपच मर्यादित आहे -- या माशासाठी सुद्धा, आपल्यासाठी तर नक्कीच. पण या फिशबोलचा अभाव म्हणजे दुःखाला जवळ करण्यासारखे आहे, आणि ह्यातून अनर्थ संभावतो. धन्यवाद.
You can share this video by copying this HTML to your clipboard and pasting into your blog or web page. This video will play with subtitles.
You either have JavaScript turned off or have an old version of the Adobe Flash Player. To view this rating widget you
need to get the latest Flash player.
If your browser allows only "trusted sites" to execute Javascript, you should add the "googleapis.com" domain to your whitelist to allow our Flash detection to work properly.
Got an idea, question, or debate inspired by this talk? Start a TED Conversation.
मानसशास्त्रज्ञ बॅरी श्वार्ट्झ आपले लक्ष वेधून घेत आहेत, पाश्चात्य समाजातील महत्त्वाच्या तत्त्वाकडे: निवडीच्या स्वातंत्र्याकडे. श्वार्ट्झ यांच्या मते, निवड आपल्याला स्वतंत्र न बनवता दुर्बल बनवते, सुखी न करता असामाधानी बनवते.
Barry Schwartz studies the link between economics and psychology, offering startling insights into modern life. Lately, working with Ken Sharpe, he's studying wisdom. Full bio »
Translated into Marathi by Chaitanya Shivade
Reviewed by Gayatri Natu
Comments? Please email the translators above.
21:16 Posted: Sep 2006
Views 5,113,658 | Comments 717
23:42 Posted: Jul 2008
Views 1,511,632 | Comments 162
19:15 Posted: Feb 2007
Views 817,101 | Comments 155
Just follow the guidelines outlined under our Creative Commons license.
This comment will be attributed to . Not ? Sign Out.